वीजबिल भरा, बक्षीस मिळवा!

मराठवाड्यातील घरगुती ग्राहकांसाठी महावितरणची अभिनव योजना

औरंगाबाद ,३१ मे /प्रतिनिधी :- वीजबिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे आणि दर महिन्याला बिल भरण्याची सवय लागावी या उद्देशाने महावितरणने औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी बक्षीस योजना आणली आहे. 1 जूनपासून सुरू होणाऱ्या या योजनेत दर महिन्याला बक्षिसे जिंकण्याची नामी संधी महावितरणने उपलब्ध करून दिली आहे.

            ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीज देण्यासाठी महावितरणने सदैव तत्पर असते. ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरावे यासाठी महावितरण त्यांना वारंवार आवाहन करते. परंतु सर्वच ग्राहक वेळेवर आपली बिले भरत नसल्याने थकबाकी वाढत आहे. त्यामुळे महावितरणला वीजखरेदीसह इतर खर्चाचा ताळमेळ बसवणे जिकिरीचे झाले आहे. आवाहनास प्रतिसाद न देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कारवाईही महावितरणला करावी लागते. तसेच बिल वेळेवर न भरणाऱ्या ग्राहकांना पुढील बिलात व्याज तसेच विलंब शुल्क आकारले जाते. हा भुर्दंड टळावा, घरगुती ग्राहकांनी वीजबिल भरण्यास स्वत:हून पुढाकार घ्यावा आणि त्यांना प्रत्येक महिन्याला बिल भरण्याची सवय लागावी यासाठी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून एक अभिनव बक्षीस योजना सुरू करण्यात येत आहे.

दरमहा बिल भरण्याचे अनेक फायदे आहेत. बिल तयार झाल्याच्या सात दिवसांत बिल भरल्यास जवळपास एक टक्के तत्पर देयक भरणा सूट मिळते. तसेच ऑनलाईन बिल भरल्यास 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट महावितरणतर्फे देण्यात येत आहे. आधीच उपलब्ध असलेल्या या सवलतींसोबतच या योजनेत भेटवस्तू स्वरूपात विविध बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळत आहे. या योजनेत थकबाकीसह दरमहा संपूर्ण वीजबिल भरणाऱ्या घरगुती वीजग्राहकांमधून सोडत पद्धतीने बक्षिसे काढण्यात येणार आहेत. बिल भरण्याच्या अंतिम मुदतीच्या आत सर्व बिले भरावी लागतील.

महावितरणचे कर्मचारी वगळता मराठवाड्यातील सर्व घरगुती ग्राहकांसाठी ही योजना आहे. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला सोडत काढण्यात येईल. दर महिन्याला मराठवाड्यातील 101 उपविभागातून 1 हजार रुपयांपर्यंतची प्रत्येकी 2 बक्षिसे वस्तू स्वरूपात दिली जाणार आहेत. त्यातील एक बक्षीस हे तत्पर देयक भरणा करणाऱ्या ग्राहकास व दुसरे बक्षीस अंतिम मुदतीच्या आत बिल भरणाऱ्या ग्राहकासाठी असेल. यासोबतच दरमहा 22 विभागांतून प्रत्येकी एका मिक्सर ग्राइंडर किंवा त्या समकक्ष वस्तू, 9 मंडलांतून प्रत्येकी एक मोबाईल हँडसेट किंवा टॅब्लेट, 3 परिमंडलांतून प्रत्येकी एक एलईडी टीव्हीचे बक्षीस दिले जाणार आहे. तर प्रादेशिक कार्यालय स्तरावर ऑनलाईन बिल भरणाऱ्या ग्राहकांमधून प्रत्येक महिन्याला रेफ्रिजरेटरचे एक विशेष बक्षीस दिले जाणार आहे. प्रादेशिक कार्यालयात स्तरावरच इलेक्ट्रिक स्कूटरचे दरमहा बंपर बक्षीस आहे.  

1 जून ते 30 ऑगस्टपर्यंत सुरू असलेल्या या योजनेचा मराठवाड्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांनी दरमहा वीजबिल भरून लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण संपर्क साधावा, असे असे आवाहन करण्यात आले आहे.