ऊस कारखान्याला जाईना,शेतकऱ्यानं आग लाऊन पेटवून दिला एक एकर ऊस

उसतोड मिळत नसल्याने व उद्विग्न होऊन शेतकर्‍याने उभ्या ऊसावर चालला रोटावेटर

जालना ,३० मे /प्रतिनिधी :-जालना जिल्ह्यात यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर झालाय.कारखान्याचा सभासद असून देखील शेतकऱ्यांच्या ऊसाला साखर कारखान्याकडून तोड मिळत नाहीय.सलग 20 महिने वाट पाहूनही कारखान्याला ऊस जात नसल्यानं जालना जिल्ह्यातील एका संतप्त शेतकऱ्यानं स्वतःच्या ऊसाला आग लावून उभा असलेला ऊस पेटवून दिला.

अंबड तालुक्यातील  वडिकाळ्या गावात ही घटना घडलीय. शरद रक्ताटे असं ऊस पेटवून देणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. रक्ताटे यांनी एक एकर  ऊसाची लागवड केली होती.मात्र  वीस महिने उलटून ही साखर ऊसाची तोड होत नसल्याने मेटाकुटीला आलेल्या शरद यांनी आज सकाळी वैतागून एक एकर उभ्या ऊसाला आग लावून हा ऊस पेटवून दिला. या घटनेमुळे जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे

अंतरवाली सराटी शिवारातील गट नंबर 19 मधील आप्पासाहेब दाजीबा राऊत या शेतकऱ्याचा दोन एकर ऊस होता. तोड मिळण्यास टाळाटाळ होत असल्याने व सतत चकरा मारून कंटाळलेल्या शेतकऱ्याने अखेर या उभ्या ऊसावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतला.   

मालक तोड करण्यासाठी पंचेचाळीस हजार रुपये मजुरांची मागणी केल्यामुळे हा ऊस मजुरांच्या पैश्या पुरता ही जातो की नाही. याची शंका असल्याने या शेतकऱ्याने उद्विग्न होऊन रोटावेटर फिरवण्याचा ठरवलं आणि आज त्या दोन एकर उसावर रोटावेटर फिरवला.   यामध्ये या शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसताना या शेतकऱ्यांनी आता पुढे खरीप हंगामाची तयारी कशी करावी? हा मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. 

————————————————————————————– 

घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांवर ऊस पेटवून देण्याची वेळ आलीय..ऊस तोड ठेकेदार आडवून लाच मागतात..कारखान्यातील अधिकारी घाणेरडे राजकारण करण्यात मग्न झालेत आज या भागातील साधारण चार लाख मेट्रिक टन ऊस उभा आहे राज्य सरकारने जाहीर केलेली मदत कारखानदारांच्या खिशात जात आहे..रोज धडाधड ऊस उत्पादक शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार व्यक्त करत आहेत ऊस पेटवून देत आहेत..ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर भयंकर संकट घोंघावत आहे..विशेष म्हणजे इतर वेळेस शेतकऱ्यांचा मोठा पुळका दाखवून राज्य राजकीय पोळ्या भाजणारे सर्व पक्षीय पुढारी मुग गिळून बसलेत..कोणत्या दिशेने जातोय आपण.

जयमंगल जाधव,जि.प.सदस्य

——————————————————————————–
 जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न भयंकर रूप धारण करत आहे ऊस तोडीसाठी ठेकेदार लाच मागतात कारखान्यातील अधिकारी शेतकऱ्यांना पैसे  मागतात ऊस घेऊन जात नाहीत या कारणावरून अंबड,घनसावंगी या दोन तालुक्यात मोठ्या संतापाची लाट निर्माण झाली आहे जिल्ह्यात दोन ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत एका शेतकरी दांपत्याने जिल्हाधिकारी कार्यालयात विष घेतले तर अनेकजन ऊस पेटवून देत आहेत.