‘अमृत सरोवर’ या योजनेच्या माध्यमातूनअकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जलसमृद्धी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अकोला,२८ मे /प्रतिनिधी :- ‘अमृत सरोवर’ या योजनेच्या माध्यमातून देशात 75 हजार तलाव, जलाशयांची निर्मिती होऊन जलसंधारणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील तलावांचाही समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांना जलसमृद्धी मिळेल. यातून शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिके घेऊन ‘अन्नदाता’ होण्यासोबत पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करुन या देशाचा ‘ऊर्जादाता’ व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जलसंधारणाची चळवळ म्हणून देशात ‘अमृत सरोवर’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यात झालेल्या कामांची पाहणी व लोकार्पण करण्यासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अकोला जिल्ह्यात आले. यानिमित्ताने येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ.ठाकरे सभागृहात ‘अमृत सरोवर’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, कुलगुरु डॉ. विलास भाले, महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरु डॉ.आशिष पातुरकर, विधान परिषद सदस्य आ. डॉ. रणजीत पाटील, आ. अमोल मिटकरी, आ. किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. आकाश फुंडकर  तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे राजीव अग्रवाल तसेच जिल्हा प्रशासनातील विभाग प्रमुख, शेतकरी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, मला अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीत एका अभियंत्याने विदर्भातील शेतकरी आत्महत्यांबाबत आपण काय उपाययोजना करतात? असा प्रश्न केला. माझ्याकडे समर्पक उत्तर नसल्याने जलसंधारणाच्या कामाची प्रेरणा जागी झाली, आणि शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय करणे,हा अग्रक्रम ठरला.  यातून अमृत सरोवर योजनेची संकल्पना आली. ही संकल्पना आधी बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात आली. ती आता अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शेतीसाठी पाणी नसणे हीच मोठी समस्या असल्याने ती दूर करण्यासाठी अमृत सरोवर योजना महत्त्वाची ठरणार आहे. याच उपक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात 34 शेततळी विकसित करण्यात येत आहेत. यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सहकार्य आहे. तलाव निर्मितीतून उपलब्ध होणारे मुरुम, माती हे महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येईल, त्या बदल्यात तलावाचे काम विनामूल्य होईल, अशी ही संकल्पना आहे. आज पाहणी केलेल्या ठिकाणी 28 मे या दिवशी पाणी असणे ही मोठी उपलब्धी आहे. यात जुन्या तलावांचा गाळ काढणे, नदी नाल्यांचे खोलीकरण करणे इ. बाबींचाही समावेश करता येणार आहे.

आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री गडकरी पुढे म्हणाले की, शेतकऱ्याला पाण्याची उपलब्धता झाल्यावर  या योजनेच्या माध्यमातून विदर्भ सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न आहे. कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांपर्यंत नवतंत्रज्ञान पोहोचवावे. त्यातून शेतकऱ्याने अधिकाधिक समृद्ध व्हावे. अन्नधान्य, तेलबिया उत्पादन घेतांनाच उपलब्ध पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन उत्पादन करुन शेतकऱ्याने केवळ अन्नदाता न होता उर्जादाताही व्हावे, अशी संकल्पना गडकरी यांनी मांडली. या सोबत पशुविज्ञान विद्यापीठानेही आधुनिक तंत्रज्ञान पशुपालकांना उपलब्ध करुन द्यावे व दुग्धोत्पादनात वाढ करावी. कृषी विद्यापीठांमधील संशोधन हे गरजेवर आधारीत असावे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि पाणी व्यवस्थापनातून आपले उत्पादन वाढवावे,असे आवाहनही त्यांनी केले.

संशोधन शेताच्या बांधापर्यंत नेण्यासाठी कृषी विद्यापीठांना 50 कोटी रुपये- दादाजी भुसे

कृषी विद्यापीठांमध्ये होणारे संशोधन हे शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पोहोचवता यावे यासाठी कृषी विद्यापीठांना दरवर्षी 50 कोटी रुपये विस्तार शिक्षणासाठी देण्यात येतील,असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले. ते म्हणाले की, कृषी विद्यापीठाला अमृत सरोवरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाले आहे,तथापि, हे पाणी वापरता यावे यासाठी राज्यशासन निधी देईल. शेतकऱ्यांनी उत्पादनाकडे लक्ष देतांनाच आपले उत्पादन विक्री करण्याचे कौशल्यही आत्मसात करावे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी ‘विकेल ते पिकेल’ यावर भर दिला आहे.कृषी विद्यापीठांमध्ये मुलींचे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक आहे,असेही त्यांनी आवर्जून सांगितले. राज्य शासनाने कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी लक्ष्मी योजना सुरु केली आहे. अमृत सरोवरच्या माध्यमातून कृषी विद्यापीठ तसेच अन्य भागात जलसंधारणाचा लाभ होईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्गचे राजीव अग्रवाल यांनी केले. तसेच कुलगुरु डॉ. भाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. किशोर बिडवे यांनी तर कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी आभार मानले.

00000

ऐन मे महिन्यात शेततळ्यात पाणी… पाहुन सुखावले गडकरी

मे महिना सरत आलेला, तसा सगळीकडे पाण्याचा ठणठणात असण्याचा काळ, पण या कालावधीतही (दि.28 मे) डॉ.पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठाच्या वणी रंभापूर येथील प्रक्षेत्रावर साकारलेल्या शेततलावात भरपूर पाणी पाहून दस्तूरखुद्द  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी सुखावले. तसे त्यांनी नंतरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलूनही दाखवले

अमृत सरोवर योजनेअंतर्गत डॉ.पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठाच्या वणीरंभापूर व बाभुळगाव या प्रक्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने शेततळे निर्माण करण्यात आले आहे. या शेततळ्याची पाहणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. यावेळी वणी रंभापूर तलावात जलपूजन करण्यात आले. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते. या पाहणी व भेटी प्रसंगी विधानपरिषद सदस्य डॉ. रणजीत पाटील,आ.अमोल मिटकरी, वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, हरिष पिंपळे, प्रकाश भारसाकळे, रणधीर सावरकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगूरु डॉ. विलास भाले, महाराष्ट्र पशू विज्ञान व मत्सविज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरु डॉ. आशिष पातुरकर, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे विविध विभागाचे विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 अमृत सरोवरांची निर्मितीची मोहिम राबविण्यात  येत आहे. याअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या प्रक्षेत्रात पाण्याचे स्त्रोत वाढावे याकरीता राष्ट्रीय माहामार्गाच्या माध्यमातून शेततळे निर्माण करण्यात आले. त्यातून महामार्गाच्या कामाला लागणारे गौण खनिजाचा वापर करण्यात आला. कृषी विद्यापीठ व पशू विज्ञान व मत्सविज्ञान विद्यापीठाअंतर्गत असलेल्या प्रक्षेत्रात 30 शेततळे निर्माण होत असून या प्रक्षेत्राला शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध होणार आहे. शेततळ्याच्या सभोवतालच्या गावांत  जलसाठ्यात वाढ होवून सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. शिवाय जलसमृद्धी आली आहे. हातपंप, विहिरी जिवंत झाल्या आहेत. भर उन्हाळ्यातही त्यात पाणीसाठा आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या प्रक्षेत्रात शेततळ्याच्या निर्मितीमुळे सहाशे हेक्टर जमीन ओलीताखाली आणणे शक्य झाले असून हरभरा, करडई पिकांचे उत्पादन घेण्यात आले आहे. यामुळे उत्पादनात वाढ होवून उत्पन्न वाढले आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

उड्डाणपुलाचे लोकार्पण

अकोला विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संपूर्ण सहकार्य – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

शहराच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी आपले नेहमीच सहकार्य असते.रस्ते विकास, जलसंधारण, शेती-व्यापार विकास यासर्व प्रश्नांची सोडवणूक करतांनाच अकोला विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण संपूर्ण सहकार्य करु, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अकोलेकरांना दिले.

अकोला शहरातील उड्डाणपूलांचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. हा सोहळा अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर पार पडला. या जाहीर कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू, विधान परिषद सदस्य आ. डॉ. रणजीत पाटील, आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. आकाश फुंडकर  तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे राजीव अग्रवाल आदी अधिकारी उपस्थित होते.

अकोला जिल्ह्याच्या विकासात अमरावती ते चिखली हा महामार्ग मोठी मोलाची भुमिका बजावणार आहे, असे सांगून त्यांनी या महामार्गालगत ट्रान्सपोर्ट हब तयार करण्यात यावे असे सांगितले. अकोला ही व्यापाराची नगरी आहे. येथे शेती, उद्योग याद्वारे कृषी व ग्रामीण क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्यास भरपूर वाव आहे. अमरावती चिखली या महामार्गाचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, जिल्ह्यात असणारा अकोला ते अकोट हा मार्गही लवकरच पूर्ण होईल.  अकोला जिल्ह्यातील कापूस हा बांग्ला देशात पाठविण्यासाठी वाहतुक मार्गात बदल केला व तो आता कमी केल्याने नदीजल मार्गाद्वारे ही वाहतुक होईल आणि सूत व कापूस मालवाहतुकीच्या खर्चात बदल झाल्याने कृषी क्षेत्राला भरारी येईल,असेही गडकरी म्हणाले.

अकोला जिल्ह्यात येत्या काळात बार्शी टाकळी ते अकोला येथे रेल्वेमार्गावर पूलास तसेच पूर्णानदीवर काटीपाटी येथील पुलासही मंजूरी देत असल्याची घोषणा यावेळी ना. गडकरी यांनी केली. जिल्ह्यात रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी कृषी, उद्योग  या सोबतच भविष्यात जलसंधारणाच्या माध्यमातून शेतकरी स्वतः इंधन तयार करुन समृद्धीचा मार्ग स्विकारतील व विदर्भ सुजलाम सुफलाम होईल,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

चिखलदरा-नरनाळा-शेगाव महामार्ग व विमानतळाचा प्रश्न मार्गी लावा- बच्चू कडू

नितीन गडकरी यांचे कामाचे नियोजन अति सूक्ष्म असते. त्यामुळेच एकीकडे महामार्गाचे काम करत असतांना शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यावरही त्यांनी भर दिला आहे. खरे तर त्यांना ‘महामार्ग सम्राट’ अशी पदवी द्यायला हवी अशा शब्दात पालकमंत्री बच्चू कडू यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. अकोला जिल्ह्यासाठी मोर्णा नदीचे सौंदर्यीकरण, चिखलदरा- नरनाळा ते शेगाव असा नवा महामार्ग तयार करावा तसेच अकोला विमानतळाचा प्रश्न मार्गी लावावा,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आ. रणधीर सावरकर यांनी जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्या मांडल्या. आ. गोवर्धन शर्मा यांनी ना. गडकरी यांच्या कार्याचे कौतूक आपल्या भाषणातून केले. सूत्रसंचालन सिद्धार्थ शर्मा यांनी तर आभार विजय अग्रवाल यांनी मानले.