ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबध्द -आ.सतीश चव्हाण यांचे प्रतिपादन

वैजापूर ,२८ मे /प्रतिनिधी :-ग्रामीण भाग आपल्या देशाचा कणा असून राज्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबध्द असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.

सन 2021-22 या आर्थिक वर्षातील तरतूदीतून आ.सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील गावंतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष 2515) या योजनेअंतर्गत वैजापूर तालुक्यात नागमठाण, टेंभी, सटाणा, लाडगाव याठिकाणी मंजूर झालेल्या एक कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन आज  आ.सतीश चव्हाण यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

सटाणा येथील ग्रामपंचायत कार्यालय ते राजपूत यांच्या घरापर्यंत सी.सी.रोड करण्यात येणार असून या कामाच्या भूमीपूजन प्रसंगी माजी आ.भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश पाटील गलांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड.प्रताप निंबाळकर, भगवाननाना तांबे, सरपंच नम्रता बोरनारे, माजी सरपंच दिलीप बोरनारे, प्रशांत शिंदे, साईनाथ आहेर आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना आ.सतीश चव्हाण म्हणाले की, ग्रामीण भाग हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे यासाठी महाविकास आघाडी सरकारने जास्तीत जास्त निधी हा ग्रामीण भागासाठी दिला आहे. मात्र अच्छे दिनचे स्वप्न दाखवणार्‍या केंद्र सरकारने ग्रामीण भागाबरोबरच शेतकर्‍यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेसाठी, शेतकर्‍यांसाठी अच्छे दिन येणार तरी कधी? असा सवालही आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.

तालुक्यातील टेंभी येथे गांवअंतर्गत सी.सी.रोड करणे, नागमठाण येथे बस स्थानक शाळेच्या पाठीमागे घोगरगांव रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटकरण करणे, लाडगांव येथील स्मशानभूमीचे सुशोभिकरणे करण्यात येणार असून या विविध विकास कामांचे भूमीपूजन देखील आज आ.सतीश चव्हाण यांच्या हस्ते. याप्रसंगी सरपंच श्वेतल पवार, उपसरपंच राजू पवार, साहेबराव पवार, डॉ.प्रवीण दुशिंग, प्रशांत शिंदे, प्रेम राजपूत, देवदत्त पवार, दत्तात्रय खुरूद, नारायण विखे, रामनाथ पाटील तांबे, रामभाऊ सावंत, गणेश चव्हाण आदींची उपस्थिती होती.