बेकायदेशीर कत्तलखान्यावर जालना पोलिसांची धाड

जालना ,२७ मे /प्रतिनिधी :- जुन्या जालन्यातील बेकायदेशीर कत्तलखान्यावर कदीम जालना पोलिसांची धाड टाकून  कत्तलीसाठी आणलेल्या दोन जिवंत कालवडीसह सव्वा क्विंटल गोवंशाचे मांस जप्त करून दोन कसायांना  अटक केली आहे. 
जुन्या जालन्यातील कुरेशी मोहल्ला भागात बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या जनावरांच्या कत्तलखान्यावर शुक्रवारी कदीम जालना पोलिसांनी अचानक धाड टाकली. यावेळी कत्तलखान्यात दोन इसम जनावरांची कत्तल करताना आढळून आले, पोलिस येण्यापूर्वीच एक गोवंशास कापण्यात आलेले होते. तर त्याठिकाणी दोन जिवंत कालवडी आढळून आल्या, त्यांनादेखील कापण्यात येणार होते, तेवढ्यात त्याठिकाणी धाड पडल्याने त्या कालवडींचे जीव वाचले. यावेळी पोलिसांनी 16 हजार रुपये किमतीच्या दोन कालवडी, 25 हजार रुपये किंमतीचे सव्वा क्विंटल मांस, एक लोखंडी मोठा सुरा, लोखंडी कुऱ्हाड, एक लोखंडी कानस, असा 41 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे._याप्रकरणी नापोकाँ. बाबा गायकवाड यांच्या फिर्यादीवरून झुल्फिकार बाशीद कुरेशी (वय 33) आणि सलीम लड्डू कुरेशी (वय 40) (रा. दोघेही कुरेशी मोहल्ला, जुना जालना) या दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा अधिनियम 5 (क), 9 (अ) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.