रस्त्याच्या वादावरून महिलेस शिवीगाळ करून जेसीबीखाली चिरडून टाकण्याची धमकी : जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल

वैजापूर, २७ मे /प्रतिनिधी :- शेतात येण्याचा जुना रस्ता बंद करण्याच्या कारणावरून एका महीलेस शिवीगाळ करून जेसीबी खाली चिरडून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य पंकज सुधाकर ठोंबरे यांच्यासह चौघांविरोधात वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सुनिता अनिल आव्हाळे यांची आघूर शिवारात गट नंबर 232 मध्ये शेती आहे. या शेतातून जाणे – येण्यासाठी जुना रस्ता आहे. हा रस्ता जेसीबी च्या सहाय्याने काही जण बंद करीत असल्याचे श्रीमती आव्हाळे यांना समजले.तेव्हा त्या तेथे जाऊन रस्ता बंद करू नका असे म्हणाल्या. त्यावर चौघांनी त्यांना शिवीगाळ केली तसेच इथून निघून जा नसता याच जेसीबीखाली चिरडून टाकू असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी सुनिता आव्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठेकेदार सुधाकर रंगनाथ ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य पंकज सुधाकर ठोंबरे, प्रशांत भाऊसाहेब ठोंबरे व योगेश प्रभाकर ठोंबरे (सर्व रा.यशवंत काॅलनी, वैजापूर) या चार जणांविरुद्ध  वैजापूर पोलीस ठाण्यात ब भादंवी कलम 504, 506 व 34 अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेतातील रस्त्याशी आव्हाळे कुटुंबाचा संबंध नाही तो रस्ता आमच्याच शेतातील आहे त्याची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. महिलेला पुढे करून प्रसिद्धीसाठी हे सारे केले जात आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी यासंदर्भात बोलतांना दिली.