संसदीय लोकशाहीला धक्का लावण्याचे काम होत आहे-माजी आमदार उल्हास पवार

औरंगाबाद ,२५ मे /प्रतिनिधी :-संसदीय लोकशाहीचा पाया देशाच्या पहिल्या मंत्रीमंडळात घातला गेला. त्यात सर्व विचारांच्या नेत्यांना स्थान देण्यात आले होते. तसेच संविधानातून धार्मिक, जातीचा एकोपा राखण्याचा प्रयत्न अभूतपुर्व केला आहे. आता त्याला धक्का लावण्याचे काम होत आहे, असे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त ‘संसदीय लोकशाही व शिक्षण’ विषयावर बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महात्मा फुले सभागृहात बुधवारी (ता. २५) हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, अधिसभा सदस्य तथा आमदार राजेश राठोड, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, अधिसभा सदस्य डॉ. जितेंद्र देहाडे, विलासराव देशमुख अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. राम चव्हाण यांची उपस्थिती होती.

आमदार राठोड म्हणाले, ‘विलासराव देशमुख यांना भेटल्यानंतर लोक आपले दु:ख विसरून जायचे. अनेकांची कामे झाली नाही झाली तरी, भेटलेला माणूस समाधानी होऊनच परत जात होता. तिढा कितीही मोठा असुदे तो सोडवण्याची कला देशमुख साहेबांकडे होती.’

श्री. देहाडे म्हणाले, ‘विद्यार्थी घडवण्यासाठी विलासराव देशमुख अध्यासन केंद्राचा उपयोग व्हावा, देशमुख साहेबांनी विद्यापीठात उभारलेला डिजिटल स्टुडिओ असो किंवा वर्धापन दिनानिमित्त दिलेला दहा कोटी रुपयांचा निधी असो. कधीही त्यांनी मुख्यमंत्री असताना विद्यापीठाला कमी पडून दिले नाही. विद्यापीठानेही त्यांना डी.लीट पदवी देऊन सन्मानित केले आहे.’

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2022-05-25-at-7.02.21-PM-1024x682.jpeg

लोकशाहीचा अतिरेक जाणवतो – कुलगुरु
सद्यस्थितीत लोकशाहीचा कधीकधी अतिरेक जाणवतो. ७५ वर्षानंतर शिक्षणाने सुसंस्कृत, शिक्षित होतो कि, अशिक्षित होत आहोत, हे कळत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीअंताची लढाई सुरु केली मात्र, ती संपलेली नाही. १९४० मध्ये ज्यांनी जात सोडली होती, त्यांना पुन्हा जात हवी आहे, हा अनुभव मागास आयोगाचा सदस्य असताना आल्याचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले म्हणाले.