‘सीईटी सेल’च्या प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करा-आ.सतीश चव्हाण यांची मागणी

औरंगाबाद ,२५ मे /प्रतिनिधी :- शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) माध्यमातून अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए आदी व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येते. यावर्षी ही प्रवेश परीक्षा ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात येणार आहे. या प्रवेश परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.25) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

          यासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटेल आहे की, शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता सीईटी सेलच्या माध्यमातून होणार्‍या परीक्षांची नोंदणी प्रकि‘या पूर्ण झाली असून सीईटी सेलच्या पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे अभियांत्रिकी, फार्मसी या  प्रवेश परीक्षा जुनमध्ये होणार होत्या. मात्र जेईई आणि नीट परीक्षा जुन-जुलै महिन्यात होत असल्याचे कारण देत शासनाने सीईटीच्या परीक्षा पुढे ढकल्या आहेत. आता सुधारीत वेळापत्रकारनुसार या सीईटी सेलच्या परीक्षा ऑगस्ट 2022 मध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार पीसीएम ग्रुपची परीक्षा 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2022 तर पीसीबी ग्रुपची परीक्षा 12 ते 20 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. नीटची परीक्षा 17 जुलै रोजी तर जेईई मेन परीक्षा 20 ते 29 जून (प्रथम सत्र) आणि 21 ते 30 जुलै (दुसरे सत्र) दरम्यान होणार आहे. जेईईच्या दोन्ही सत्रांमध्ये अंदाजे एक महिन्याचा कालावधी उपलब्ध आहे. व या कालावधीत आपण सीईटी सेलच्या माध्यमातून घेण्यात येणार्‍या परीक्षा सहजतेने घेऊ शकतो. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) यांनी सूचविलेल्या सुधारित तारखांनुसार जर परीक्षा घेतल्या तर 2022-23 हे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सुरू होईल. व जर ह्याच परीक्षा 30 जुन ते 20 जुलै या कालावधीत घेतल्या तर सप्टेंबरमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करता येणे शक्य होईल असे आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.

सदरील प्रवेश परीक्षा लांबल्यास त्याचा आर्थिक भुर्दंड विद्यार्थी आणि महाविद्यालयांना बसणार आहे. तसेच कोरोना काळात विविध अडचणींमुळे मागील शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले. परिणामी सध्या प्रथम वर्ष व व्दितीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना कमी कालावधी उपलब्ध असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अनेक अडचणी येत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनाव्दारे निदर्शनास आणून दिले.

त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) माध्यमातून अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, आर्किटेेक्चर आदी व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या सीईटी परीक्षा नीट व जेईई परीक्षेच्या तारखा वगळून जुन, जुलै महिन्यातच घेण्यात याव्यात अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.