समाजाने काय दिले यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो याचा विचार स्नातकांनी करावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३८ वा दीक्षान्त समारोह

मुंबई,२५ मे /प्रतिनिधी :- समाजाने आपल्याला काय दिले याचा विचार न करता आपण समाजाला काय देऊ शकतो याचा विचार स्नातकांनी करावा. स्नातकांनी सर्वप्रथम जीवनातील आपले ध्येय सुनिश्चित करावे व आई वडील व राष्ट्रसेवेचा संकल्प करावा. युवकांनी ठरविल्यास ते समाजात परिवर्तनदेखील घडवू शकतात, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज (दि. २५) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा अडतीसावा दीक्षान्त समारंभ झाला, त्यावेळी राजभवन मुंबई येथून सहभागी होताना राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, अधिसभेचे मान्यवर सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आज जग संशोधन, नवसंशोधन, इन्क्युबेशनच्या युगात प्रवेश करीत आहे. हे संशोधन विज्ञान किंवा कृषी विज्ञान या क्षेत्रातच करता येते असे नाही तर ते इतिहास, मानव्यशास्त्र यांसह सर्व शाखेत करता येते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आंतर शाखीय अध्ययन तसेच विज्ञानासोबत संगीत शिकण्याची देखील संधी उपलब्ध आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांनी स्टार्ट अप, स्वयंरोजगार या माध्यमातून नवउद्यमी झाले पाहिजे.  केवळ नोकरी शोधणे हे लक्ष्य ठेवल्यास आत्मनिर्भरतेचे ध्येय गाठता येणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले.

हरियाणा येथील एका गावात अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन आलेली तरुणी सरपंच म्हणून कार्य करीत आहे असे सांगून स्नातकांनी पदवीनंतरदेखील आपले शिक्षण सुरु ठेवावे तसेच गावाच्या, राज्याच्या व देशाच्या विकासात योगदान द्यावे असे राज्यपालांनी सांगितले.

‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा श्लोक उद्धृत करत राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, मानवजातीच्या कल्याणाचा विचार मनात ठेवून त्यादृष्टीने आपल्या कार्याची दिशा विद्यार्थ्यांनी निश्चित करावी. समाज व देशाला आपल्याला काय देता येईल, याचा विचार करावा. आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी. प्रगतीसाठी ध्येय निश्चित असणे आवश्यक आहे. प्रत्येक कार्यात अडचणी येतच असतात. पण त्यावर मात करत पुढे गेले पाहिजे. परिवर्तनाची ताकद तरूणांमध्ये आहे. देशाला व समाजाला उन्नतीची दिशा देण्यासाठी नवे मार्ग शोधावेत. संशोधनाच्या नव्या वाटा चोखाळाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

स्नातकांनी महापुरुषांचे आदर्श समोर ठेवावे : उदय सामंत

पदवी प्राप्त केल्याबद्दल स्नातकांचे अभिनंदन करताना युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांचे जीवनचरित्र अभ्यासावे तसेच संत गाडगेबाबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.  विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांची, विद्यापीठाची तसेच राज्याची नेहमी आठवण ठेवली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

देशसेवेचा संकल्प करा :उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

शिक्षण घेऊन प्रगती साधत असताना आपल्या मायभूमीचा विसर पडता कामा नये. अनेकदा विद्यार्थी परदेशी जाऊन शिक्षण पूर्ण करतात व देशात परतत नाहीत. जगभर जाऊन शिक्षण व ज्ञान मिळवलेच पाहिजे; पण आपल्या गावाचा, समाजाचा, महाराष्ट्र व देशाचा विसर पडू नये. आपल्या ज्ञानाचा देश व समाजसेवेसाठी उपयोग व्हावा. त्यामुळे आजच्या दिनी तसा संकल्प करण्याचे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी केले.

अनेक महापुरुष, शूरवीर, संत महात्मे, विद्वान यांचा समृद्ध वारसा महाराष्ट्रभूमीला आहे. तो आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे. चित्रपटातील काल्पनिक पात्रांचे संवाद करमणूकीपुरते ठीक असतात. आपले आदर्श हे आपले महापुरुष असले पाहिजेत. महापुरूषांच्या विचार व कार्याचे सतत स्मरण करून समाजहित व देशसेवेसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग होण्यासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

यंदाच्या अंदाजपत्रकात अनेक उपक्रमांसाठी तरतूद : कुलगुरू डॉ. मालखेडे

विद्यापीठाच्या विकासासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात संशोधन अनुदान योजनसह दिव्यांगांच्या सोयी-सुविधेची तरतूद आहे. बुलडाणा येथील आदर्श पदवी महाविद्यालयासाठी विद्यापीठ निधीतून दीड कोटी रू., विद्यापीठ ग्रंथालयासाठी 3.69 कोटी, परिसर सुशोभीकरणासाठी 90 लक्ष रू., आयसीटी प्रकल्पासाठी 50 लक्ष रू., कुलगुरू अकादमिक गुणवत्ता पुरस्कार योजना, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी बहुसुविधा केंद्र यासाठी 1 कोटी 75 लक्ष रू. आदी तरतुदींचा समावेश केला आहे, असे कुलगुरू डॉ. मालखेडे यांनी सांगितले.

संत गाडगेबाबा विद्यापीठाने या वर्षीपासून पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांना पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धत (चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ) लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांनी आपल्या अहवालात सांगितले.

नव्या अभ्यासक्रमामध्ये अनिवार्य प्रकल्प, कौशल्याधारित शिक्षण, इंटर्नशिप, सेमिनार, फिल्डवर्क, इत्यादींचा समावेश केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते ५५०१९ स्नातकांना पदव्या व १२५ पदविका प्रदान करण्यात आल्या. दीक्षान्त समारंभात २१० संशोधकांना आचार्य पदवी तसेच १३६ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण व रौप्य पदके तसेच रोख पारितोषिके प्रदान करण्यात आले.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, संख्या व परीक्षा मूल्यमापन मंडळ डॉ. हेमंत देशमुख, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता तसेच स्नातक उपस्थित होते.