यांचे मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात-रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

औरंगाबाद ,२३ मे /प्रतिनिधी :-औरंगाबाद शहरातील भीषण पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या औरंगाबादकरांचे प्रश्न मांडण्यासाठी भाजपने आयोजित केलेल्या जल आक्रोश मोर्चात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सभेला संबोधित करताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री घरातून कामं करतात, अशी टीका दानवेंनी केली. ते म्हणाले की, हे सरकार जेलमधून आणि घरातून काम करेत. यांचे दोन मंत्री जेलात आणि मुख्यमंत्री घरात आहेत. कोरोना काळात आमच्या पक्षाचे आमदार-खासदार बाहेर फिरले पण मुख्यमंत्री बाहेर पडले नाहीत. कोरोना काळात त्यांनी काय घोषणा दिली? माझं कुंटूंब माझी जबाबदारी. पण, तुम्ही जबाबदारी स्विकारली नाही. आमचे लोक जनतेत गेले. तेव्हा फडणवीस म्हणाले होते, मुख्यमंत्री घरात आणि आम्ही तुमच्या दारात. त्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले.”

Image

“मुख्यमंत्री सोलापूरला गेले, त्यांना शेतकरी म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अतिवृष्टी झाली, त्याची मदत मंजूर झालीये पण अजून मिळाली नाही. आम्हाला मदत करा. तर, मुख्यमंत्री म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी. त्यानंतर मुख्यमंत्री उस्मानाबादला गेले, तिथे हॉटेलवाले भेटले, ते म्हणाले, कोरोना काळात कर्ज काढलं, कोरोना आला आणि पैसे बुडाले. केंद्राने पॅकेज दिलं, तुम्ही आम्हाला मदत करा. हे सगळीकडे गेले आणि म्हणाले माझं कुटुंब माझी जबाबदारी. आरे पण, तु्म्ही जबाबदारीपासून पळ काढला,” अशी टीकाही दानवेंनी केली.

Image

दानवे पुढे म्हणाले, “कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केली. लोकांना मोफत लस दिली, मोफत राशन दिलं, पण राज्याने काहीच दिलं नाही. आता आमची जनतेकडून एकच अपेक्षा आहे, जनतेनं यांना अद्दल घडवावी. हा मोर्चा फक्त भाजपचा नाही, आम्ही लोकांचा आवाज ऐकला आणि तो आवाज सरकारपर्यंत नेण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही विरोधीपक्ष म्हणून आमचं काम करतो. तुम्ही आज आमची हाक ऐका. सरकारने जनतेचं ऐकावं, नाहीतर ही जनता तुमच्या कानशिलात लगावल्याशिवाय राहणार नाही,” असेही दानवे म्हणाले.