वैजापूर येथे कांदा व ऊसाच्या प्रश्नावर भाजपचे धरणे आंदोलन ; तहसीलदारांना निवेदन

वैजापूर ,२३ मे /प्रतिनिधी ;- कांद्याच्या भावात झालेली घसरण व ऊसाच्या प्रश्नासंदर्भात भाजप व शेतकरी मित्र प्रतिष्ठाणतर्फे वैजापूर तहसील कार्यालयासमोर सोमवारी  (ता.23) धरणे आंदोलन करण्यात आले.

कांद्याचे पडलेले भाव, गाळपाअभावी शिल्लक ऊस आदी प्रश्नांमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला असतांना महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस हे पक्ष केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात दंग आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी काही एक देणे घेणे नाही. अशा सरकारला येत्या निवडणुकीत खाली खेचून धडा शिकवा असे आवाहन भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथ जाधव व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी केले. 

नाफेडमार्फत प्रति क्विंटल दोन हजार रुपये दराने कांदा खरेदी करावी, शिल्लक ऊसाला एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, जळीत ऊसाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतीसाठी दिवसा विना खंडित वीज पुरवठा करावा आदी मागण्यांसाठी तालुका भाजपा व शेतकरी मित्र प्रतिष्ठानतर्फे वैजापूर तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात भाजपाचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, शेतकरी मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव डोंगरे, जिल्हा दूध संघाचे संचालक कचरू पाटील डिके, उद्योग आघाडीचे कैलास पवार, अल्पसंख्यांक आघाडीचे नबी पटेल, ज्ञानेश्वर जगताप, नारायण तुपे आदींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन राज्य सरकारवर टिका केली.‌

येत्या काही दिवसांत सरकारने कांद्याच्या भावाबाबत योग्य भुमिका न घेतल्यास भाजपातर्फे शंभर रुपये दराने कांदा खरेदी करुन शहरातील रस्त्यांवर कांदा टाकला जाईल, आंदोलन आणखी तीव्र करु असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात मोहन आहेर, सुरेश राऊत, प्रभाकर गुंजाळ, सतीश शिंदे, अनिल वाणी, अनिल साठे, प्रशांत कंगले, दिनेश राजपूत, गोरख घायवट, चंद्रशेखर साळुंके, कारभारी कराळे, दिनेश राजपूत आदींनी सहभाग नोंदवला. नायब तहसिलदार  महेंद्र गिरगे यांना मागण्या़चे निवेदन देण्यात आले.