भारत आणि जपान यांच्यातील विशेष राजनैतिक आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करण्याचा आमचा उद्देश -पंतप्रधान नरेंद्र मोदी

जपान दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध केलेले निवेदन

नवी दिल्ली ,२२ मे /प्रतिनिधी :- जपानचे पंतप्रधान, माननीय फुमिओ कीशिदा यांच्या आमंत्रणावरुन, मी येत्या 23-24 मे 2022 रोजी जपानची राजधानी तोक्यो इथे जाणार आहे.

मार्च 2022 मध्ये झालेल्या 14 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेच्या निमित्ताने मला  जपानचे पंतप्रधान फुमिओ कीशिदा यांचे भारतात स्वागत करण्याची संधी मिळाली होती. माझ्या तोक्यो भेटीदरम्यान, आम्हा दोघांमध्ये झालेला सुसंवाद अधिक पुढे नेण्याचा माझा मानस असून, भारत आणि जपान यांच्यातील विशेष राजनैतिक आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करण्याचा आमचा उद्देश असेल.

जपानमध्ये मी क्वाड नेत्यांच्या दुसऱ्या प्रत्यक्ष बैठकीमध्ये देखील सहभागी होणार आहे. ही बैठक, क्वाडचे सदस्य असलेल्या चारही देशांच्या नेत्यांसाठी, क्वाड अंतर्गत सुरु असलेल्या विविध उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची उत्तम संधी असेल. त्याचवेळी आम्ही, हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील घडामोडी आणि परस्पर हिताच्या अनेक जागतिक मुद्यांवर देखील  व्यापक चर्चा करु.

त्याशिवाय, माझी अमेरिकेचे अध्यक्ष, जोसेफ बायडन यांच्यासोबत द्वीपक्षीय बैठकही होणार आहे. या बैठकीत आम्ही, अमेरिकेसोबतच्या आमच्या बहुआयामी द्विपक्षीय संबंधाना अधिक दृढ आणि मजबूत करण्याविषयी चर्चा करु. तसेच, प्रादेशिक घडामोडी आणि सध्या सुरु असलेल्या जागतिक प्रश्नांवरची आमची चर्चाही आम्ही पुढे घेऊन जाऊ.

ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अॅंथनी अल्बानीस देखील पहिल्यांदाच क्वाड संमेलनात सहभागी होणार आहेत. त्यांच्याही सोबत द्वीपक्षीय बैठक करण्यास मी उत्सुक असून, सर्वसमावेशक राजनैतिक भागीदारी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुआयामी सहकार्य, तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर त्यांच्यासोबत या बैठकीत व्यापक चर्चा होणे अपेक्षित आहे.

भारत आणि जपान दरम्यानची वित्तीय भागीदारी हा देखील आमच्या विशेष राजनैतिक आणि जागतिक भागीदारीचा महत्वाचा पैलू आहे. मार्च महिन्यातील शिखर परिषदेत, पंतप्रधान कीशिदा आणि मी, येत्या पाच वर्षात, जपानमधून भारतातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांत 5 ट्रिलियन येन (JPY) ची गुंतवणूक करण्याचा मानस असल्याची घोषणा केली होती. या आगामी भेटीत, मी जपानमधील उद्योजक-व्यवसाय प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन, या उद्दिष्टप्राप्तिसाठी दोन्ही देशातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करणार आहे.

जपानमध्ये  सुमारे 40 हजार भारतीय लोक राहतात. हे सर्व भारतीय नागरिक, भारताच्या जपानसोबतच्या संबंधांचे वाहक आणि दूत आहेत. त्या सर्वांसोबत संवाद साधण्यासही मी उत्सुक आहे.