मोदी सरकारचा मोठा निर्णय-पेट्रोल ९.५० तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त:अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची घोषणा

गॅस सिलेंडरवर २०० रुपयांचे अनुदान देणार

नवी दिल्ली ,२१ मे /प्रतिनिधी :- केंद्र सरकारकडून पेट्रोल ९.५० तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वाढत्या महागाई दरम्यान सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ही घोषणा केली आहे.

अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलच्या किमती ७ रुपये प्रति लिटरने कमी होतील, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किंमतींवरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या उत्पादनांवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

निर्मला सीतारामण यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “केंद्राने पेट्रोलवर ८ रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील ६ रुपये प्रति लिटर केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोलचे दर ९.५ रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहे.

गॅस सिलेंडरवर २०० रुपयांचे अनुदान

Image

सर्वसामान्य महिलांना घरगुती गॅस परवडत नसल्याने त्यांनी रस्त्यावर चुली मांडून आंदोलने केली. हे सर्व लक्षात घेऊन महिला वर्गाला दिलासा देण्यासाठी पहिल्या १२ सिलेंडरपर्यंत २०० रुपये प्रति सिलेंडर अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

त्यामुळे ९ कोटी उज्ज्वला योजना धारकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे दरवर्षी जवळपास सहा हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. मात्र, या निर्णयामुळे माता-भगिनींची विस्कटलेली आर्थिक गणितं स्थिर होण्यास मदत होणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.

आतापर्यंत किती वेळा दरात केली कपात

2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरच्या आकडेवारीनुसार, मोदी सरकारमध्ये आतापर्यंत तीन वेळा उत्पादन शुल्क कमी करण्यात आले आहे. 4 ऑक्टोबर 2017 रोजी मोदी सरकारने पहिल्यांदा पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 19.48 रुपयांनी आणि डिझेलवरील 15.33 रुपयांनी कमी केले होते.

2018 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने 4 ऑक्टोबर रोजी जनतेला मोठा दिलासा दिला. त्यानंतर सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 17.98 रुपयांनी तर डिझेलवरील 13.83 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली होती. 

4 नोव्हेंबर 2021 रोजी मोदी सरकारने दिवाळीच्या एक दिवस आधी महागाईचा सामना करणाऱ्या जनतेला भेट दिली. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 27.9 रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 21.8 रुपयांनी कमी केले होते.

मोदी सरकारमध्ये पेट्रोल किती महाग झाले?

2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 110 डॉलर होती. त्यावेळी पेट्रोल ७२ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ५५.४८ रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होते. तेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 16 रुपयांपेक्षा जास्त फरक होता.

आजच्या कपातीपूर्वी राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरने मिळत होते. मोदी सरकारचे हे आकडे बघितले तर गेल्या 8 वर्षात पेट्रोल 45 टक्के आणि डिझेल 75 टक्क्यांनी महागले आहे.