औरंगाबाद जिल्ह्यातील विनायक व गंगापूर साखर कारखाना 25 वर्षासाठी भाडेतत्वावर

जफर ए.खान

वैजापूर ,२१ मे :-थकीत कर्जापोटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असलेले व गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेले औरंगाबाद जिल्ह्यातील विनायक सहकारी साखर कारखाना लि.परसोडा व गंगापूर सहकारी साखर कारखाना लि.रघुनाथनगर हे दोन्ही साखर कारखाने जयहिंद शुगर लि. आचेगांव (सोलापूर) या कारखान्याने 25 वर्षासाठी भाडेतत्वावर चालविण्यास घेतले आहे.
राज्यातील दहा साखर कारखान्यांकडे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीपोटी काही साखर कारखान्यांची यापूर्वी विक्री करण्यात आली आहे. साखर कारखान्यांची विक्री करण्यात आल्यामुळे सरकारवर टीका झाली होती. त्यामुळे यापुढे साखर कारखान्यांची विक्री न करता ते भाडे तत्वावर देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला व थकबाकीपोटी जप्त करण्यात आलेले साखर कारखाने 25 वर्षासाठी भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत 19 मे होती. 20 मे रोजी निविदा उघडण्यात येऊन औरंगाबाद जिल्ह्यातील विनायक सहकारी साखर कारखाना लि. परसोडा व गंगापूर सहकारी साखर कारखाना लि. रघुनाथनगर हे दोन्ही साखर कारखाने जयहिंद शुगर लि.आचेगांव  (दक्षिण सोलापूर) या साखर कारखान्यास 25 वर्षासाठी भाडेतत्वावर चालविण्यास देण्यात आले आहे.
राज्य सहकारी बँकेची गंगापूर साखर कारखान्याकडे 87 कोटी 19 लाख तर विनायक साखर कारखान्याकडे 57 कोटी 2 लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. थकीत रकमेपोटी या कारखान्यांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या या कारखान्यांची दुरुस्ती करून ते चालू करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे कारखाने 25 वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.गाळपाच्या प्रत्येक टनामागे शंभर रुपये तर डिस्टीलरीसाठी लिटरमागे दोन रुपये आकारण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तालुक्यातील हक्काचे कारखाने बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेजारच्या नाशिक – नगर जिल्ह्यातील साखर करखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक होत होती. तालुक्यातील साखर कारखाने भाडेतत्वावर चालविण्यासाठी देण्यात आल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.