वर्ष 2025 पर्यंत माध्यम आणि मनोरंजन उद्योगाची वृद्धी 53 बिलियन अमेरिकी डॉलर पर्यंत-केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर

भारतीय आशय जागतिकस्तरावर प्रेक्षकांच्या हृदयावर आणि मनावर अधिराज्य करत आहे: अनुराग ठाकूर

नवी दिल्‍ली,१९ मे /प्रतिनिधी :-“है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहां के गाता हूं, भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं “, अशा शब्दात आपले विचार मांडत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज कान येथील प्रसिद्ध पॅलेस डे फेस्टिव्हलमध्ये इंडिया फोरमला संबोधित केले. अनुराग ठाकूर यांनी परदेशी आणि भारतीय चित्रपट निर्माते, पत्रकार आणि प्रतिनिधींसह अनेक प्रेक्षकांसमोर  आपले मुख्य भाषण केले.

श्रीमती  वाणी त्रिपाठी यांनी आयोजित केलेल्या या सत्रात भारत सरकारचे माहिती आणि  प्रसारण सचिव श्री अपूर्व चंद्रा, लेखक, कवी आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष श्री प्रसून जोशी, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आर माधवन, भारतीय  चित्रपट निर्माता, अभिनेता, दूरचित्रवाणी प्रस्तुतकर्ता  उद्योजक  भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे अध्यक्ष शेखर कपूर,  संपादक आणि  हॉलीवूड रिपोर्टर स्कॉट रॉक्सबरो,  निर्माते फिलिप एव्हरिल, सहभागी झाले होते. 

कान चित्रपटाच्या महत्वाविषयी बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की गेल्या काही वर्षांत भारत-फ्रांस  संबंध दृढ करण्यात ‘फेस्टिव्हल डी कान्स’ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारतीय चित्रपटांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की भारतीय आशय  जागतिकस्तरावर  प्रेक्षकांच्या हृदयावर आणि मनावर अधिराज्य करत आहे आणि याचा पाया घातला प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते चेतन आनंद यांच्या 1946 मध्ये  प्रदर्शित झालेल्या “नीचा नगर”  या चित्रपटाने    आणि त्यानंतर  एक दशकभराने 1956 मध्ये प्रदर्शित झालेल्या पाथेर पांचाली या विख्यात दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या चित्रपटाने. या दोन्ही चित्रपटांना कान महोत्सवात दिला जाणारा पाम डी ओर   Palme d’Or. हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला होता. आज  भारताने सिनेमॅटिक उत्कृष्टतेच्या बळावर  जगभरात आपली ओळख निर्माण केली असून  ‘जगाचे आशयाचे केंद्र ’ म्हणून स्वतःला सिद्ध करायला भारत  सज्ज आहे, असेही श्री ठाकूर  म्हणाले.

कानमध्ये भारताच्या सध्याच्या उपस्थितीबद्दल बोलताना श्री ठाकूर  म्हणाले, ” जागतिक प्रेक्षक, देशाच्या सिनेमॅटिक उत्कृष्टतेचा अनुभव , तांत्रिक परिपक्वता , समृद्ध संस्कृती आणि कथाकथनाचा उत्कृष्ट वारसा देण्याचा भारताचा  मानस आहे”. “भारताच्या रेड कार्पेटवरच्या उपस्थितीने  आमच्या चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेचे वैविध्य तर  टिपले आहेच मात्र यात  केवळ विविध भाषा आणि प्रदेशांतील अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांचे  प्रतिनिधीत्व अधोरेखित केलेले  नाही तर  ओटीटी प्लॅटफॉर्म, संगीतकार आणि ज्यांनी तरुण आणि वृद्ध अशा दोन्ही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे अशा लोककलाकारांची  उपस्थिती देखील उल्लेखनीय आहे. असे ठाकूर यांनी नमूद केले.

कानमध्ये भारतीय स्टार्टअप्सच्या स्थापनेबाबत  ठाकूर यांनी  उपस्थितांना माहिती दिली. माध्यम  आणि मनोरंजन क्षेत्रातील स्टार्टअप्स मधील व्यावसायिकांचे  सक्षम प्रतिनिधिमंडळ   त्यांचे  तांत्रिक कौशल्य दाखवतील  आणि अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक (AVGC) या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट गोष्टी जगासमोर मांडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री महोदयांनी, उपस्थितांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध उपाय योजनांची माहिती दिली आणि  केंद्राने गेल्या 8 वर्षात भारतामधे सह-निर्मिती, चित्रपटाचे चित्रीकरण आणि चित्रपट सुविधांना चालना देण्यासाठी मोठे उपक्रम साकारल्याचे सांगितले. या प्रयत्नांचे उद्दिष्ट भारतातील प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन यांना पूरक प्रणालीला चालना देण्याचे आहे. या माध्यमातून 2025 पर्यंत वार्षिक 53 अब्ज अमेरीकी डॉलर्स उलाढाल होण्याची अपेक्षा आहे असे त्यांनी नमूद केले.  

केन्द्र सरकारने महत्वाच्या 12 सेवा क्षेत्रांपैकी (‘चॅम्पियन सर्व्हिस सेक्टर्स’) एक म्हणून दृक् श्राव्य (ऑडिओव्हिज्युअल) सेवांना मान्यता दिली आहे. नुकतीच त्यासाठी एका एव्हीजीसी* धडक कृती दलाची स्थापना केली आहे. यात उद्योगातील प्रमुखांचा समावेश आहे. जगाचे निर्मिती पश्चात कामांचे प्रमुख पसंतीचे केंद्र म्हणून आपले स्थान निर्माण करण्यासाठी आणि या क्षेत्रात भारताला भरारी घेता यावी याकरता धोरणात्मक रुपरेषा हे दल तयार करेल अशी माहिती ठाकूर यांनी दिली. 

“कृत्रिम बुद्धिमत्ता(आर्टिफिशियल इंटेलिजन्स), आभासी वास्तव(व्हर्चुअल रियालिटी), मेटाव्हर्स सारखे तंत्रज्ञान, भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कुशल मनुष्यबळासाठी सध्या असलेल्या संधी लक्षात घेता, भारतातील ओटीटी बाजार 2024 पर्यंत दरवर्षी 21% दराने सुमारे 2 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे” असे मंत्री महोदयांनी सांगितले.   परदेशी चित्रपट निर्मात्यांनी भारतात चित्रीकरणासाठी यावे, भारतातील आदरातिथ्याचा आनंद घ्यावा आणि येथील नजरबंदी करणाऱ्या निसर्गदृश्यांचा आस्वाद घ्यावा असे आग्रहाचे आमंत्रण देऊन त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. भारतात चित्रित होणाऱ्या परदेशी चित्रपटांसाठी सरकारने बुधवारी आकर्षक आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले आहे.

स्वस्त ब्रॉडबँड आणि मोबाईलच्या सहज उपलब्धतेमुळे  चित्रपट उद्योगावर होणार्‍या प्रतिकूल परिणामांवर शेखर कपूर यांनी मत व्यक्त केले. भारत जगातील सर्वात मोठी ‘प्रभाव टाकणारी अर्थव्यवस्था’ बनणार आहे आणि लवकरच तरुण चित्रपट निर्मात्यांद्वारे सिनेमा पुन्हा परिभाषित केला जाईल असेही ते म्हणाले.

जागतिक बाजारपेठेला भुरळ घालण्यासाठी भारतीय चित्रपटकथनाच्या शैलीकडून आणखी बऱ्याच अपेक्षा असल्याचे मत स्कॉट रॉक्सबरो यांनी मांडले. त्यावर अपूर्व चंद्रा यांनी लंचबॉक्स, मिस्टर अँड मिसेस अय्यर आणि रॉकेट्री सारख्या चित्रपटांचा हवाला दिला. या चित्रपटांच्या कथांचा गाभा सामान्यत: भारतीय असला तरी जगभरातील प्रेक्षकांच्या भावनांना तो प्रतिध्वनित करतो असे सांगत स्कॉट रॉक्सबरो यांच्या मताचे चंद्रा यांनी खंडन केले.

भारताकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाला सांगण्यासारखे खूप काही आहे आणि चित्रपट जगताने याचा शोध घेतला पाहिजे. भारतात, आर्यभट्ट ते सुंदर पिचाई पर्यंत अनेक असामान्य कथा आहेत. त्या जगभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत असे आर माधवन म्हणाले.