औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवस बंद:पुरातत्त्व खात्याचा निर्णय

औरंगाबाद ,१९ मे /प्रतिनिधी :- खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. औरंगजेब कबर कमिटीच्या मागणीनंतर पुरातत्त्व खात्याने हा निर्णय घेतला आहे.

यासाठी औरंगजेब कबर कमिटीने यासाठी पुरातत्त्व विभागाकडे मागणी केली होती. त्यानंतर पुरातत्त्व विभागाकडून राज्यातील सद्यस्थिती पाहता औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवस बंद ठेवण्यात आली आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात कशाला पाहिजे असा सवाल मनसेने केल्यावर कबर परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

सध्या औरंगजेबाच्या कबर परिसरात बंदुकधारी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. कबरीचा परिसर पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली येतो, कमिटीच्या मागणीनंतर पुरातत्त्व खात्याने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीका झाली होती. छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर जाण्याची गरज काय आहे? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

मशिदी आणि मंदिराचाही वाद देशात वाढला असून त्याच पार्श्वभूमीवर औरंगजेब कबर कमिटीने पर्यटकांसाठी कबर पाच दिवस बंद ठेवण्याची मागणी केली होती. त्यावर पुरातत्त्व विभागाने हा निर्णय घेतला असून पोलिसांचा बंदोबस्त खुलताबादेत वाढवण्यात आला आहे.