खासदार शरद पवार यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे उद्घाटन

मुंबई,१८ मे /प्रतिनिधी :- पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज सकाळी उद्घाटन झाले.यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, खासदार डॉ.प्रीतम मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

खासदार शरद पवार यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे उद्घाटन

डॉ. लहाने यांनी वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून यापुढेही या नेत्रालयाच्या माध्यमातून असेच काम करीत राहतील, असा विश्वास उद्घाटनप्रसंगी श्री. पवार यांनी व्यक्त केला.

येणाऱ्या काळात डॉ. लहाने यांनी नेत्रशल्यचिकित्सक विषयात पदव्युत्तर संस्था सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी केले.

सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ‘माझी शाळा, सुरक्षित शाळा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी, मानसिक आरोग्य, मधुमेह तपासणी करण्यात येत असून येणाऱ्या काळात डोळ्यांची तपासणी करण्यासाठीही डॉ. लहाने यांनी पुढाकार घ्यावा असे पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. डॉ. लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयामध्ये मोतीबिंदू, कॉर्निया, रेटिना, ऑक्युलोप्लास्टिया यासारख्या डोळ्यांच्या व्याधींवर उपचार केले जाणार आहेत.