नांदूर- मधमेश्वर कालव्याच्या वाढीव मागणीसाठी शेतकऱ्यांनी मागणी नोंदवावी -आ.बोरणारे

वैजापूर ,१५ मे /प्रतिनिधी ;-वैजापूर, गंगापूर व कोपरगाव तालुक्यांना सिंचनासाठी अतिशय उपयुक्त असलेल्या नांदुर मधमेश्वर जलदगती कालव्यातुन पाण्याचे वाढीव आवर्तन मिळावे अशी मागणी आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी केली आहे.

या तालुक्यांसाठी उन्हाळी हंगामासाठी सोडण्यात आलेले आवर्तन नुकतेच संपले आहे. पण या तिन्ही तालुक्यांना उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर वाढीव पाणी मिळावे या दृष्टिकोनातुन आमदार बोरनारे यांनी पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी केली आहे. सध्या गोदावरी डावा व उजवा कालव्यातुन पाण्याचे आवर्तन सुरु असुन हे आवर्तन ३० में पर्यंत सुरु राहणार आहे. या काळात अतिरिक्त पाणी मिळाल्यास कमीत कमी पंधरा दिवस आवर्तनातुन पाणी उपलब्ध होऊ शकते.

पाटबंधारे विभागाने गोदावरी डावा व उजवा कालव्यासोबत जलदगती कालव्यातुन पाणी सोडल्यास वैजापूर, गंगापूर व कोपरगाव या तिन्ही तालुक्यांना सहजरित्या दोन्ही आवर्तने मिळुन एक टीएमसी पाणी मिळण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्याप्रमाणे मराठवाड्यातील वैजापूर व गंगापूर तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांकडुन पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी नोंद होत नसल्याने सिंचनासाठी कालव्यातुन अपेक्षित पाणी मिळत नसल्याची ओरड आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासुन वंचित रहावे लागत आहे. जलदगती कालवा क्षेत्रातील लाभार्थी शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी नोंदवावी असे आवाहन कालवा सल्लागार समितीचे बाबासाहेब जगताप व अंकुश सुंब यांनी शेतकऱ्यांना केले आहे.