महालगाव येथे गाय-वासराचा फडशा: वन्य प्राण्याच्या भीतीने परिसरात दहशत

वैजापूर ,१२ मे /प्रतिनिधी :-महालगाव (ता. वैजापूर) येथे वन्य प्राण्याने एक गाय व वासराचा फडशा पाडला.

महालगाव शिवारातील शेत गट क्रमांक 58 मधील शेतवस्तीवर असलेल्या केशव निवृत्ती झिंझुर्डे यांची एक गाय व कालवड या प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले‌. हा वन्य प्राणी तडस असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण पसरले आहे‌.

गावकऱ्यांनी घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर कवठे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक बी.एस. चव्हाण, डॉ. नवनाथ डुकरे, पोलिस पाटील सुधाकर शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेचा पंचनामा करण्यात आला. वनविभागाने या ठिकाणी अद्याप पिंजरा बसवला नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात भिंतीचे वातावरण पसरले असुन वनविभागाने वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.