राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला-नाना पटोले

मुंबई ,११ मे /प्रतिनिधी :-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ‘राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला’ या आणखी एका विधानामुळे महाविकास आघाडीत वातावरण गरम होण्याची शक्यता आहे. भंडारा गोंदियात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला एकाकी पाडण्यात आले. राष्ट्रवादीने भाजपसोबत आघाडी केल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतापले आहेत. त्यांनी ‘मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू!’ असे ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृहजिल्ह्यातील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची करत भाजपला सुरूंग लावला व भाजपमधल्या माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाने बंड करून काँग्रेसला यश मिळवून दिले.

या बंडखोरीमुळे व भंडाऱ्यासोबतच गोंदिया येथील निवडणुकांत राष्ट्रवादीने भाजपाशी हातमिळवणी करून काँग्रेसला एकाकी पाडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान वाघमारे यांना भाजपातून निलंबित केल्याची घोषण पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यानंतर नाना पटोले भलतेच नाराज झाले आहेत.

गोंदिया जिल्हा परिषदेतही मंगळवारी जि. प. पदाधिकाऱ्यांची निवड होती. तेथेही भंडारा जिल्हा परिषदेप्रमाणेच भाजपा व राष्ट्रवादीने युती केली. ५३ सदस्यीय गोंदिया जि. प. मध्ये २६ सदस्यीय भाजपला बहुमतासाठी केवळ एका मताची गरज होती. तेथे काँग्रेसचे १३ व राष्ट्रवादीचे ८ सदस्य निवडून आले होते. अन्‍य सदस्यांमध्ये ४ सदस्य चावी संघटनेचे, तर २ सदस्य अपक्ष होते. येथे काँग्रेसला एकाकी पाडून भाजपचा अध्यक्ष, तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष निवडून आला.