शिवसेनेच्या सभेच्या प्रसिद्धीसाठी राज ठाकरेंच्या सभेचे फुटेज

मुंबई ,११ मे /प्रतिनिधी :- राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी १४ मे रोजी उद्धव ठाकरे मुंबईच्या बीकेसी मैदानावर सभा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या सभेचे टिझर लाँच करून शिवसेनेकडून जोरदार वातावरणनिर्मिती केली जात आहे. या टिझरवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. टिझरमध्ये असलेली गर्दी ही राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेतील असल्याचा दावा मनसेचे नेते गजानन काळे यांनी केला आहे. आता कळले असली कोण आणि नकली कोण, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. दरम्यान, काळे यांच्या आक्षेपानंतर शिवसेनेकडून ते फुटेज काढण्यात आले आहे.

शिवसेनेकडून, लावण्यात आलेल्या ‘असली आ रहा है, नकली से बचो’, अशा आशयाचे बॅनर्सवर मनसे नेते आक्रमक झाले आहेत. असली, नकली म्हणणाऱ्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करा. काहीतरी अस्सल तुमचे असु द्या. इतके ही नकली होऊ नका. अजून माणसे जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का, असा सवाल गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमधून उपस्थित केला आहे. तसेच आपली चूक लक्षात आल्यावर शिवसेनेने टिझरचे ट्विट डिलिट केल्याचेही गजानन काळे यांनी म्हटले आहे.

१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली होती. या सभेला राज्यभरातून मनसैनिक आले होते. पोलिसांनी या सभेसाठी केवळ १५ हजार श्रोत्यांची मर्यादा आखून दिली होती. मात्र, प्रत्यक्षात या सभेला मोठी गर्दी जमली होती. राज ठाकरे यांच्या सभांना जमणारी गर्दी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र, आता शिवसेनेने आपल्या सभेच्या प्रसिद्धीसाठी राज ठाकरे यांच्या सभेचे फुटेज वापरल्याने वाद पेटण्याची शक्यता आहे. आता शिवसेना यावर काय स्पष्टीकरण देणार हे पाहावे लागेल.