सांगली जिल्ह्यातील चारशे वर्ष जुना वटवृक्ष वाचविण्याचा निर्णय

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले समाधान; पर्यावरणाचे संवर्धन करुनच विकासकामे
सांगली जिल्ह्यातील चारशे वर्ष जुना वटवृक्ष वाचविण्याचा निर्णय

मुंबई, दि. २३ : मौजे भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष पुरातन वटवृक्ष वाचविण्याचा निर्णय झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ च्या प्रकल्प संचालकांनी वटवृक्ष वाचविण्याबाबतचे पत्र सर्व संबंधितांस दिले आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा वटवृक्ष विचाविण्यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली होती. तसेच याबाबत मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगली जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या होत्या. सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, पर्यावरण कार्यकर्ते यांच्यासह स्थानिक लोकांनी हा वटवृक्ष वाचविण्यासाठी आंदोलन केले होते. या सर्वांची दखल घेत आता हा वटवृक्ष वाचविण्याचा निर्णय झाला आहे.

या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करत यापुढील काळातही राज्यातील कोणतीही विकासकामे ही पर्यावरणाचे संवर्धन करुनच केली जातील, याबाबत आपण स्वत: बारकाईने लक्ष ठेवून कार्यवाही करु, अशी ग्वाही मंत्री श्री. ठाकरे यांनी दिली. याबरोबरच या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे तसेच सांगली जिल्हाधिकारी, महामार्ग प्रकल्प संचालक आणि उपविभागीय अधिकारी यांचे आभार मानले आहेत.

मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, राज्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन व्यापक कार्य करीत आहे. वृक्षसंवर्धनही त्याअनुषंगाने फार महत्त्वाचे आहे. सांगली जिल्ह्यातील संबंधित वटवृक्ष पुरातन असून त्याचे जतन होणे गरजेचे आहे. विकास कामे करताना राज्याचा वारसा आणि पर्यावरण जपणे गरजेचे आहे. कोणतीही विकासकामे करताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.   

सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा महाकाय वटवृक्ष

रत्नागिरी – कोल्हापूर – मिरज – सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ चे काम सध्या सुरु आहे. मिरज ते पंढरपूर शहरांच्या दरम्यान हा महामार्ग मौजे भोसे (तालुका मिरज, जि.सांगली) या गावातून जातो. या गावातील गट क्रमांक ४३६ येथे यल्लमा देवीचे पुरातन मंदिर असून या मंदिरासमोरच सुमारे ४०० वर्षापूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे. त्याचा विस्तार सुमारे ४०० चौमी इतका व्यापक आहे. हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच, त्याचबरोबर ते वटवाघूळ आणि इतर दुर्मिळ पक्षी यांच्याकरिता नैसर्गिक निवासस्थान देखील आहे. नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे या पुरातन वटवृक्षास बाधा पोहोचणार होती. वटवृक्ष तोडावा लागणार होता. या वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता तसेच परिसरातील पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाचा विचार करता संबंधित जागेवरील महामार्गाचे संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचे जतन होण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *