नौगाजी बाबा उरुसानिमित्त वैजापुरात शांतता समितीची बैठक

वैजापूर, १० मे  /प्रतिनिधी :- येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या शाही हजरत सय्यद शाह रुकनुद्दीन उर्फ नौगाजी बाबा यांचा उरूस बुधवारपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने तीन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे व त्यानंतर 8 ते 10 दिवस हा उरूस राहणार आहे.

या पार्श्वभूमीवर माजी आमदार भाऊसाहेब  चिकटगावकर  यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस स्टेशन मध्ये मंगळवार रोजी शांतता समिती बैठक झाली.भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, तहसीलदार राहुल गायकवाड, उप विभागीय पोलीस अधिकारी (गंगापूर) जी. एस.बेले, माजी नगराध्यक्ष राजूसिंह राजपूत, हाजी अकील सेठ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक शांतता समितीचे सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले. श्री.बेले यांनी शांतता राखून व बंधुभाव समोर ठेऊन उरूस उत्सव साजरा करावा असे आवाहन केले. तहसीलदार गायकवाड यांनीही खबरदारी उपाय सुचविले.

पोलीस पाटील यांना स्वयंसेवक म्हणून त्यांचे सहकार्य घ्यावे तसेच वीज कनेक्शन अधिकृतरित्या तपासून घ्यावे असे तहसीलदार यांनी सांगितले, डॉ. परदेशी यांनी नगरपालिकेमार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व स्वछता करण्याची जबाबदारी स्वीकारली.भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी शांतता व सलोखा राखून पोलिस कुमक वाढवावी व उरूस कमिटीने सहकार्य करावे असे सुचविले, शेवटी गोपनीय शाखेचे संजय घुगे यांनी आभार मानले. अल्ताफ बाबा, काझी हाफीजुद्दीन, शैलेश चव्हाण, गणेश खैरे, दिनेश राजपूत, प्रकाशसेठ बोथरा, प्रशांत शिंदे,ज्ञानेश्वर सिरसाट, विलास म्हस्के, सुनील त्रिभुवन, प्रशांत त्रिभुवन, अमोल राजपूत, आवेज खान, अकबर भाई, श्री.चाऊस यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.