अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये ? न्यायालयाने राणा दाम्पत्यांना नोटीस बजावली

मुंबई ,९ मे /प्रतिनिधी :- मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यांना माध्यमांसोबत बोलण्यास बंदी घातली होती. तरीही त्यांनी माध्यमांसोबत बोलून अटींचे उल्लंघन केले आहे, असा आरोप मुंबई पोलिसांनी कोर्टात केला होता. असाच युक्तीवाद सरकारी वकिलांनी आज न्यायालयात केला. न्यायालयाने आता राणा दाम्पत्यांना तुमच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये? अशी नोटीस बजावली आहे.

राणा दाम्पत्यांनी त्यांच्या वक्तव्याने जामीन अटींचे उल्लंघन केले असून जामीन आदेशानुसार त्यांचा जामीन रद्द करण्यात आला आहे. या जोडप्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे, असे पोलिस आणि सरकारी वकिलांनी म्हटले आहे. त्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्यांना अटक होईल का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.