शैक्षणिक संस्था या केवळ शिक्षणाचे स्थान नव्हे तर आपल्यातल्या सुप्त कलागुणांना पैलू पाडत नवी झळाळी देणारे ठिकाण : राष्ट्रपती राम नाथ कोविंद

नागपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या स्थायी परिसराचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

नागपूर,८ मे /प्रतिनिधी :- शैक्षणिक संस्था या केवळ शिक्षणाचे स्थान नव्हे तर आपल्यातल्या सुप्त कलागुणांना पैलू पाडत नवी झळाळी देणारे ठिकाण असल्याचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी म्हटले आहे. नागपूरच्या मिहान, दहेगाव मौजा इथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या स्थायी परिसराचे उद्घाटन करताना ते आज बोलत होते. अभ्यासक्रम हा आपल्याला आपले ध्येय, महत्वाकांक्षा याबाबत आत्मपरीक्षणाची संधी देत आपल्या स्वप्नांची पूर्तता करतो, असे राष्ट्रपती म्हणाले. नाविन्यता (इनोव्हेशन) आणि उद्योजकता या दोन्हींमध्ये आपले जीवन सुखकर करण्यासोबतच रोजगार उपलब्ध करुन देण्याचीही क्षमता आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) ही   रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अशी परिसंस्था ठरेल, असा विश्वास देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे व्यक्त केला.

Image

नवोन्मेश आणि उद्योजकता यांना प्रशंसेची पावती देत प्रोत्साहन देणाऱ्या युगात आपण राहत आहोत. नवोन्मेश आणि उद्योजकता या दोन्हीतही, तंत्रज्ञानाद्वारे आपले जीवन अधिक सुकर करण्याची क्षमता तर आहेच त्याचबरोबर अनेकांना रोजगाराच्या संधी पुरवण्याचेही सामर्थ्य आहे. आयआयएम नागपूर इथली परिसंस्था, रोजगार मागणारे ऐवजी रोजगार पुरवणारे होण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी प्रोत्साहन देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Image

आयआयएम नागपूरने, आपल्या उद्योजकता केंद्राद्वारे आयआयएम नागपूर फौंडेशन फॉर इंट्राप्रेनरशिप डेव्हलपमेंट (InFED) उभारल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. इनफेडने महिला स्टार्ट अप कार्यक्रमातून महिला उद्योजकांना यशस्वी पदवीधारक होण्यासाठी सक्षम केल्याची बाब निश्चितच अभिमानास्पद असल्याचे सांगून त्यापैकी सहा जणींनी उद्योगाचा प्रारंभ केल्याचे राष्ट्रपती म्हणाले. असे कार्यक्रम, महिला सबलीकरणासाठी प्रभावी मंच पुरवतात.

कोणतीही गोष्ट परस्परांमध्ये वाटून घेण्याच्या, विशेषकरून ज्ञान क्षेत्रात आपल्याकडचे ज्ञान इतरांनाही देण्यावर आपल्या संस्कृतीचा नेहमीच भर राहिला आहे. म्हणूनच आपल्याकडे जे ज्ञान आहे ते सर्वांना देणे हे आपले कर्तव्य आहे असे राष्ट्रपतींनी सांगितले. आयआयएम अहमदाबादने ज्याप्रमाणे नागपूर आयआयएमसाठी मार्गदर्शन पुरवले आहे, त्याचप्रमाणे देशातल्या तंत्र, व्यवस्थापन क्षेत्रातल्या अग्रगण्य व्यावसयिक शिक्षण देणाऱ्या संस्था अशाच संस्थांच्या उभारणीसाठी मार्गदर्शन पुरवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ज्ञान दान केल्याने, दुसऱ्याला दिल्याने ज्ञानाची वृद्धी होते असे राष्ट्रपती म्हणाले. पुणे, हैदराबाद आणि सिंगापूर इथे उपग्रह परिसर उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आयआयएम नागपूरचे अभिनंदन केले. 

आयएएमच्या माध्यमातून एक जागतिक दर्जाची वास्तु शहरात निर्माण झाली असून नागपूर हे एज्युकेशन हब म्हणून विकसित होत असल्याचा अभिमानास्पद उल्लेख करून श्री. गडकरी म्हणाले, मेडिकल तसेच लॉजिस्टिक हब म्हणूनही नागपूर विकसित होत आहे. विदर्भातील समृद्ध वने व  खनिजसंपदा यावर आधारित उद्योगांना मोठ्या प्रमाणात संधी आहे. उद्योगांच्या विकासासाठी या संस्थेने संयुक्तपणे उपक्रम राबविल्यास या भागाचा विकास होणार आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून या संस्थेचा निश्चितच नावलौकिक वाढेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पाश्चिमात्यांच्या तुलनेत स्थानिक शिक्षणप्रणालीला महत्त्व देणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी भारताच्या एका प्रमुख संस्थेच्या कॅम्पसचे लोकार्पण होत असल्याचा आनंद व्यक्त करून श्री. प्रधान म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या ज्ञान, अर्थ आणि नितीला अनुसरून या संस्थेची वाटचाल असावी. तसेच या संस्थेने गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील शाळा, महाविद्यालयांच्या विकासाचे माध्यम व्हावे. विभागातील छोटे उद्योग, तसेच रस्त्यावरील व्यावसायिकांसाठी आयआयएमने पुढाकार घेवून व्यवसाय सुलभतेचे मॉडेल तयार करावे, असे आवाहन त्यांनी केले.

नागपूर आयआयएम संस्थेतून बुद्धिमान विद्यार्थी व साहसी उद्योजक निर्माण होतील, असा आत्मविश्वास व्यक्त करताना श्री. देसाई म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी विदर्भाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्या दिशेने आज एक महत्वाचे पाऊल पडत आहे. या संस्थेने अनेक आंतरराष्ट्रीय संस्थेशी भागीदारी केली असून विविध देशातील संस्था या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणांना आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण मिळत आहे. ही संस्था नागपूरसह राज्यासाठी महत्त्वपूर्ण असल्यामुळे या संस्थेच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे संपूर्ण सहकार्य देण्यात येणार आहे.

विक्रमी वेळेत हे काम पूर्ण झाल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त करून श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक दर्जाचे कौशल्ययुक्त मनुष्यबळ मिळावे, यासाठी व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा विस्तार करण्याची सुरुवात केली आहे. कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्माण करण्याची ही प्रक्रिया असून नागपुरात उभी राहिलेली वास्तू ‘स्टेट ऑफ आर्ट दर्जाची ‘ असून नवीन भारताचे स्वप्न साकारणारी आहे, असे गौरवोद्गार काढले. प्रशिक्षित मनुष्यबळ असेल तेथेच उद्योग येतात. त्यामुळे या परिसरात जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरु झाल्याने उद्योजकतेचा विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतीय व्यवस्थापन संस्थेचे संचालन करणाऱ्या  मंडळाचे अध्यक्ष सी.पी. गुरुनानी यांनी प्रास्ताविक केले. या संस्थेच्या माध्यमातून नाविन्याची, संशोधनाची जिद्दी असणारी पिढी निर्माण करण्याची आमची मोहीम असून जागतिक दर्जाचे कॅम्पस निर्माण करू शकल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी, राष्ट्रपतींनी भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या सुसज्ज अशा इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करून उद्घाटन केले. त्यानंतर 132 एकर क्षेत्रावर विकसित करण्यात आलेल्या परिसराची पाहणी केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रपती यांना स्मृतिचिन्ह देवून स्वागत केले. संचलन समितीचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी व संचालक डॉ. भीमराय मैत्री यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

लोक आयआयएम नागपूरला भेट देऊन नागपूरचे भविष्य पाहण्यासाठी येतील. भविष्यातील जागतिक नेते घडवण्याचा वारसा या संस्थेकडे असेल अशी भावना आयआयएम नागपूरच्या प्रशासक मंडळाचे  अध्यक्ष   सी पी गुरनानी यांनी व्यक्त केली. आयआयएम नागपूरला मिहान  येथील जागेत जाण्यापूर्वी  व्ही.एन.आय. टी. ने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभारही मानले. 

नागपूर शहरातील वर्धा रोडवरील मिहान परिसरात 132 एकर जागेवर आयआयएम नागपूरचा कॅम्पस उभारण्यात आला आहे. त्याची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आणि ऑगस्ट 2015 मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आले. बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून संपूर्ण आयआयएम कॅम्पस त्याच परिसरात एम्स हॉस्पिटलला लागून आहे.

सध्या,  आयआयएम  नागपूर 668 विद्यार्थ्यांना ऑन-कॅम्पस पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम आणि विविध ऑनलाइन प्रमाणपत्र कार्यक्रमांसह व्यवस्थापन शिक्षण देत आहे. कॅम्पसमध्ये 20 हाय-टेक क्लासरूम आणि 24 प्रशिक्षण केंद्रे तसेच 400 आसन क्षमता असलेले एक सभागृह देखील समाविष्ट आहे.या कार्यक्रमाला आयआयएमचे विद्यार्थी, शिक्षक,  पदाधिकारी, विविध उद्योग संघटनाचे प्रतिनीधी उपस्थित होते