हज यात्रेसाठी 79237 भारतीय मुसलमान नागरिक,निम्म्या महिलांचा समावेश

मुंबई ,७ मे /प्रतिनिधी :- केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईत हज हाऊस येथे ‘खादीम-अल-हज्जाज’ या दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केले.

‘खादीम-अल-हज्जाज’ हे प्रशिक्षित स्वयंसेवक भारतीय हज यात्रेकरूंना मक्का-मदिना येथे मदत करतील. यात्रेकरूंचे आरोग्य आणि स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्याची विनंती केंद्रीय मंत्री नक्वी यांनी या स्वयंसेवकांना केली. या वर्षीच्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये 12 महिला प्रशिक्षणार्थींसह देशाच्या सर्व राज्यांमधून आलेले 400 हून अधिक ‘खादीम-अल-हज्जाज’ सहभागी होत आहेत. मक्का-मदिना येथील यात्रेकरूंची निवास व्यवस्था, वाहतूक, आरोग्य आणि सुरक्षितता या गोष्टींसह हज यात्रेशी संबंधित सर्व प्रक्रियांबद्दल या प्रशिक्षणार्थींना या प्रशिक्षणादरम्यान तपशीलवार माहिती देण्यात येईल. भारतीय हज समितीचे पदाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन संस्था, डॉक्टर्स, विमान कंपन्यांचे अधिकारी, सीमाशुल्क तसेच स्थलांतरण विभागाचे अधिकारी या दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतील.

वर्ष 2022 मधील हज यात्रेसाठी 79,237 भारतीय मुसलमान नागरिक जाणार असून त्यात निम्म्या संख्येने महिलांचा समावेश आहे. यातील 56,601 भारतीय मुसलमान भारतीय हज समितीच्या माध्यमातून तर 22,636 मुसलमान एचजीओ अर्थात हज समूह आयोजकांच्या माध्यमातून हज 2022 यात्रेसाठी जाणार आहेत.  एचजीओची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यावर्षीच्या हज यात्रेसाठी 1800 हून मुस्लीम महिला ‘मेहरम विना’ म्हणजे पुरुष सहकाऱ्याच्या सोबतीविना आणि लॉटरी पद्धतीमध्ये भाग न घेता या यात्रेला जाणार आहेत. हज 2022 साठी एकूण 83,140 अर्ज सादर झाले आहेत.

भारतीय हज समितीच्या माध्यमातून हज 2022 साठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी मुंबई, अहमदाबाद, बेंगळूरू,कोचीन, दिल्ली, गुवाहाटी,हैदराबाद,कोलकाता,लखनौ आणि श्रीनगर ही 10 प्रवेशस्थाने निश्चित केली आहेत.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, हज 2022 या यात्रेला हज यात्रेकरूंचे आरोग्य आणि कल्याण यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन महत्त्वपूर्ण सुधारणांसह आरंभ होत आहे.  ते म्हणाले की संपूर्ण हज 2022 या यात्रेची प्रक्रिया भारत सरकार आणि सौदी अरेबिया सरकारच्या आवश्यक मार्गदर्शक सूचनांसह तयार करण्यात आली आहे. यामध्ये पात्रता निकष, वयोमर्यादा, आरोग्य संबंधित आवश्यकता इत्यादींचा समावेश आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हज यात्रा होऊ शकलेली नाही,असे  सांगत केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, “यात्रेकरूंवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत कारण ते कोणत्याही अनुदानाशिवाय हज यात्रा करणार आहेत. सौदी अरेबियाकडून  परवडणाऱ्या दरात निवासव्यवस्था, वाहतूक आणि इतर आवश्यक सुविधांसाठी प्रक्रिया सुरू आहे.”

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, हज यात्रेकरूंची निवड प्रक्रिया संपूर्ण करताना कोरोना लसीकरणाच्या दोन्ही मात्रा आणि भारत सरकार आणि सौदी अरेबिया सरकारने ठरवलेल्या आवश्यक निकषांची पूर्तता करून निश्चित करण्यात आली आहे.

संपूर्ण हज 2022 प्रक्रिया 100 टक्के डिजिटल/ऑनलाइन करणे हे पारदर्शक, सुलभ, परवडणारे आणि सोयीस्कर असून त्यासोबत हज यात्रेतील लोकांचे आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरले आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. यावर्षी 72170 हज अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले, ही उत्साहवर्धक बाब असल्याचे ते म्हणाले.

पुढे बोलताना नकवी म्हणाले, डिजिटल हेल्थ कार्ड, “ई-मसिहा” आरोग्य सुविधा आणि “ई-लगेज प्री-टॅगिंग”, मक्का-मदीनामधील निवास/वाहतूक यासंबंधी सर्व माहिती प्रदान करून, सर्व हज यात्रेकरूंना वेळोवेळी दिली जाईल.

हा संपूर्ण गुजरातसाठी प्रवासासाठी प्रवेशबिंदू अहमदाबाद येथे असेल. संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यासाठी बेंगळुरू आहे.  केरळ, लक्षद्वीप, पुदूच्चेरी, तामिळनाडू आणि अंदमान आणि निकोबार या भागांसाठी कोचीन हा प्रवास आरंभ बिंदू असेल. दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, चंदीगड, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेशातील पश्चिम जिल्ह्यांसाठी दिल्ली हा  प्रवास आरंभ बिंदू असेल.  आसाम, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि नागालँडचा यासाठी गुवाहाटी प्रवास आरंभ बिंदू असेल.  हैदराबाद प्रवास आरंभ बिंदू हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांसाठी आहे.  कोलकाता प्रवास आरंभ बिंदू हा पश्चिम बंगाल, ओडिशा, त्रिपुरा, झारखंड आणि बिहार या राज्यांसाठी आहे. लखनऊ प्रवास आरंभ बिंदू पश्चिमेकडील भाग वगळता उत्तर प्रदेशातील सर्व भाग व्यापेल;  महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली यासाठी मुंबई प्रवास आरंभ बिंदू असेल तर जम्मू-काश्मीर, लेह-लडाख-कारगिल या भागांसाठी श्रीनगर प्रवास आरंभ बिंदू असेल.

2022 च्या हज यात्रेसाठी महाराष्ट्रातून 4874 आणि गोव्यातून 67 नागरीक रवाना होणार आहेत.