पदुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्समधील अत्याधुनिक सुविधांचा वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी अधिक कौशल्ये विकसित करण्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे आवाहन

नवी दिल्ली, ३ मे  /प्रतिनिधी :-खेळ खेळण्यासाठी आठवड्याची अखेर किंवा सुट्टीची वाट पाहू नये तर सुरुवात कुठेही आणि कधीही करावी, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.

पदुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्स (सीएसई) येथे ते खेळाडूंशी संवाद साधत होते. या केंद्रातील अत्याधुनिक सुविधांचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी अधिक कौशल्ये विकसित करण्याकरता केला पाहिजे असे ते म्हणाले.

पदुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्स (सीएसई) हे बेंगळुरूमध्ये 15 एकरवर बांधलेले जागतिक दर्जाचे एकात्मिक क्रीडा संकुल आहे.  बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, जलतरण, स्क्वॅश, बास्केटबॉल आणि नेमबाजीमध्ये सीएसईने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.  स्पर्धात्मक आणि हौशी क्रीडापटू, व्यावसायिक प्रशिक्षक, क्रीडा अकादमी आणि महत्त्वाकांक्षी तरुण प्रतिभांना त्यांच्या आवडीच्या खेळात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे सीएसईचे उद्दिष्ट आहे. सीएसईला नुकतेच भारताच्या क्रीडा प्राधिकरणाने बॅडमिंटन आणि जलतरण या दोन्हींसाठी राष्ट्रीय उत्कृष्टता  केंद्र म्हणून  मान्यता दिली आहे.

सीएसई मधील अकादमी क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि घडवण्याकरता तळागाळातील स्तरावरील कार्यक्रम आखते, तसेच भविष्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्याचे उद्दिष्टही सीएसईने ठेवले आहे.  लक्ष्य सेन, श्रीहरी नटराज, अश्विनी पोनप्पा आणि अपूर्वी चंदेली यांसारख्या भारतातील प्रतिभावान आणि यशस्वी खेळाडू सीएसईने घडवले आहेत.

खेळाडूंच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे जागतिक स्तरावर कामगिरी करण्यासाठी त्यांना क्रीडा विज्ञानाद्वारे आवश्यक असलेले सहकार्य उपलब्ध करणे. सीएसई मध्ये, अभिनव बिंद्रा टार्गेटिंग परफॉर्मन्स सेंटर (एबीटीपी), वेसोमा क्रीडा वैदयकीय केन्द्र आणि समिक्षा सायकोलॉजी हे आपल्या खेळाडू आणि सहभागींना फिजिओथेरपी, दुखापतींतून सावरणे, हायड्रोथेरपी, जेरियाट्रिक केअर, क्रीडा आहार आणि क्रीडा मानसोपचार यासह विविध सेवा देतात.

क्रिकेटपटू राहुल द्रविड, पदुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्सचे (सीएसई) व्यवस्थापकीय संचालक, विवेक कुमार, सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी या भेटीदरम्यान उपस्थित होते.