शासन शेतकरी, कष्टकरी, सामान्यांच्या पाठिशी– पालकमंत्री सुभाष देसाई

  • शिवभोजनचे 26 लाखांहून अधिक लाभार्थी
  • प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राज्यात जिल्हा प्रथम
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या  चित्र प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन
  • पर्यटन विकासासाठी अर्थसंकल्पात 1 हजार 704 कोटींची तरतूद
  • शहाजी राजे भोसले स्मारक परिसराच्या सुशोभीकरणास भरीव निधी

औरंगाबाद ,१ मे /प्रतिनिधी :- कोविड परिस्थ‍िती,  मिशन वात्स्ल्य, ऑरिकमधील सुविधा, उभारी 2.0 उपक्रम,  संतपीठाची सुरूवात, पर्यटन  विकास, संत ज्ञानेश्वर उद्यानाचा पुनर्विकास, छत्रपती  शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ  पुतळा, संत एकनाथ रंग मंदिर नूतनीकरण आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेले राज्यस्तरीय चित्र प्रदर्शन आदी जिल्ह्यातील कामांचे कौतुक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.  जनतेला उद्देशून केलल्या या शुभेच्छा संदेशात त्यांनी कष्टकरी, सामान्य आणि शेतकऱ्यांच्या खंबीरपणे शासन पाठिशी उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी  दिली.

Image

पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त्‍ मुख्य शासकीय समारंभ पार पडला. या कार्यक्रमास आमदार अंबादार दानवे, आमदार अतुल सावे, चंद्रकांत खैरे, नंदकुमार घोडेले, रशीद मामू आदींसह  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम.प्रसन्ना, पोलिस आयुक्त डॉ.  निखील गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे,  जिल्हा पोलिस अधीक्षक मनीष कलवा‍निया आदींची उपस्थ‍िती होती.

Image

            पालकमंत्री  देसाई म्हणाले,  महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहिदांना विनम्र अभिवादन करतो. सर्व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेणारे शेतकरी, कष्टकरी कामगार, कोरोना योध्दे, उपस्थित अधिकारी, कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी, नागरीक, विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, सामाजिक समतेचा पाया रचणारे छत्रपती शाहू महाराज, भारताला लोकशाहीचे देणं देणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व थोर राष्ट्र नेत्यांच्या विचारांचा वारसा जपणारे आपले महाराष्ट्र राज्य आहे.

Image

            विकासाच्या प्रकियेत राज्य शासन शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.  जिल्ह्यात पहिल्या डोसचे प्रमाण 83 टक्के तर दुसऱ्या डोसचे प्रमाण 61.80 टक्के एवढे आहे. कोविडमध्ये पालक गमावलेल्या मुलांना तसेच विधवा महिलांना ‘मिशन वात्सल्य’च्या माध्यमातून लाभ दिला जातो. दोन्ही पालक गमावलेल्या 27 मुलांना 5 लाख रुपयांच्या मुदत ठेवीच्या माध्यमातून मदत करण्यात आलेली आहे. 

            ‘शिवभोजन’ ही महाराष्ट्र शासनाची महत्वकांक्षी योजना 2020 पासून सुरू आहे. जिल्ह्यातील 57 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून 26 लाख 12 हजार 826 गरजूंनी शिवभेाजनाचा लाभ घेतला आहे. ऑरिक सिटी ही एक जागतिक दर्जाची औद्योगिक वसाहत असून ऑरीकमध्ये आजपर्यंत 150 कंपन्यांना भूखंड वाटप करण्यात असून पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ऑरिक सिटीत विविध सुविधा उपलब्ध असल्याने  विदेशी गुंतवणुकीसाठी औरंगाबादला प्राधान्य देण्यात येत आहे.

            रोजगार हमी योजनेमध्ये जिल्ह्याने 252 टक्के उद्दिष्ट साध्य करीत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत देशात महाराष्ट्र तर राज्यात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. या योजनेअंतर्गत 107 अन्न प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उभारी 2.0’ या अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाच्या  माध्यमातून कुटुंबनिहाय गरजांचे वस्तूनिष्ठ  विश्लेषण आणि उपाययोजनांचा आराखडा बनविण्यात येत आहे. खुलताबाद आणि कन्नड येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुबियांना विविध उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘विकेल ते पिकेल’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मराठवाड्यात केसर आंब्याला बाजारपेठ मिळावी यासाठी ‘उत्पादक ते ग्राहक’ या योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाने महापालिका हद्दीत 12 ठिकाणी आंबा विक्रीकरिता जागा दिली  आहे. याकरिता जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात आला आहे.

             पैठण येथे संत एकनाथ महाराज संतपीठामध्ये विविध अभ्यासक्रमांची सुरूवात झालेली आहे. पर्यटन विकासासाठी अर्थसंकल्पात एक हजार 704 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. वेरुळ येथील श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिराच्या आवारात एक हजार व्यक्ती क्षमतेचा सभा मंडप उभारण्यात येणार आहे. या सभामंडपाचे बांधकाम मूळ बांधकामाशी साधर्म्य असणारे असल्याने ते पारंपरिक, टिकाऊ व आकर्षक होईल आणि मंदिराचे मूळ सौंदर्य कायम राहणार आहे. वेरुळ येथील शहाजी राजे भोसले स्मारक परिसराचे सुशोभिकरण करुन जतन व संवर्धन करण्याचा निर्णय स्मारक विकास समितीने घेतला आहे. यासाठी जिल्हा वार्षिक समिती मधून 1 कोटी 41 लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. तसेच CSR  च्या माध्यमातून देखील 53 लाख रुपये सौंदर्यीकरणासाठी प्राप्त झाले आहेत. पैठण येथे संत ज्ञानेश्वर उद्यान पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे नक्कीच पर्यटनास चालना मिळणार आहे. पैठणच्या जायकवाडी प्रकल्पावर जल पर्यटन प्रकल्प हाती घेतला जात आहेत.

            सामाजिक न्याय विभागाच्या ‘तृतीय पंथीय कल्याण योजने अंतर्गत’ 25 रेशन कार्ड आणि 9 ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. स्वाधार योजनेतंर्गत एकूण 12 हजार 312  विद्यार्थ्यांना 57 कोटी 45 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. राज्यातील जनतेला शासनाच्या विविध सेवा विहित कालमर्यादेत मिळाव्यात यासाठी शासनाने ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम’  2015  मध्ये पारित केलेला असून तो यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. यामध्ये आजपासून नवीन 105 लोकसेवा लागू करण्यात येत आहेत.

             शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. शहरातील प्रियदर्शनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन उभारणीसाठी  25 कोटी रुपये  मंजूर  करण्यात आले असून स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे.  शहराचा पाण्याचा प्रश्न सोडविणारी 1 हजार 680 कोटी रुपयांची शहर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांच्या हस्ते संत एकनाथ रंग मंदिराच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याचेही श्री.देसाई म्हणाले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन

शासनाच्या व्दिवर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती जनतेला व्हावी यासाठी चित्रमय आणि मजकूर रुपाने राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यभरात विभागीय स्तरावर 1 ते 5 मे या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शहरात हे प्रदर्शन जिल्हा परिषदेसमोरील सिमंत मंगल कार्यालय येथे असून सर्वांनी नक्कीच या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन देखील पालकमंत्री देसाई यांनी केले.

सुरूवातीला श्री. केंद्रेकर यांनी मंत्री देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर श्री. देसाई यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले, परेडचे निरीक्षण करून त्यांनी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश दिला.  यावेळी देसाई यांच्याहस्ते बक्षीस वितरण करून त्यांनी प्रमुख अतिथी, स्वातंत्र्यसैनिक व  निमंत्रितांची भेट घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.