महाराष्ट्रातील सामाजिक समतेचा समृद्व वारसा जपण्यातच सर्वांचे हित – पालकमंत्री अशोक चव्हाण

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

▪️कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देवून गौरव

▪️पथसंचलनातील सशस्त्र महिला पोलीस पथकाने वेधले लक्ष

▪️शालेय शिक्षण विभागातर्फे आकर्षक सादरीकरण

नांदेड ,१ मे/प्रतिनिधी :- महाराष्ट्राला ऐतिहासिक, भौगोलिक, वैचारिक, सामाजिक सुधारणेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. गत दोन हजार वर्षांच्या काळात या भूमीने आपल्या कष्टाच्या बळावर विविध क्षेत्रात अपूर्व ठसा उमटविला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन रयतेला जाणता राजाची प्रचिती दिली.  महाराष्ट्राला एका बाजुला शौर्याचा स्फुर्तीदायी वारसा तर दुसऱ्या बाजुला संत, महात्म्यांच्या समतेचा, प्रबोधनाचा समृद्ध वारसा लाभला आहे. हा समतेचा वारसा जपण्यातच महाराष्ट्राचे हित आहे असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय  कवायत मैदान  येथे मुख्य शासकीय ध्वजारोहन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत, महापौर जयश्रीताई पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक व जेष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती नंतर आपण लोककल्याणकारी राज्याची संकल्पना स्विकारली. हे राज्य लोककल्याणासाठी बांधिल आहे. लोक सहभागातून लोकांसाठी, लोकांच्या कल्याणासाठी काम करण्याचा संकल्प आपण जपला आहे. 1 मे 1962 रोजी आपण जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची स्थापना केली. आज याला बरोबर 60 वर्षाचा कालावधी होत आहे. आपली नांदेड जिल्हा परिषद आता 61 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या 60 वर्षाच्या कालावधीत विकास कामांची अनेक टप्पे आपण पार केले आहेत. 

May be an image of 5 people, people standing and outdoors

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पाठोपाठ जिल्हा परिषदेचा हिरक महोत्सव, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे रौप्य महोत्सवी वर्षे तसेच येत्या 17 सप्टेंबरपासून सुरू होणारे मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष हा चांगला योगा- योग जुळून आला असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात दळणवळणाची सुविधा अधिक भक्कम व्हावी याकडे आपले विशेष लक्ष आहे. समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी नांदेड ते जालना पर्यंतचा समृद्धी जोड महामार्ग आवश्यक होता. त्या दृष्टीने आम्ही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी केली. त्यांनी याचे महत्त्व ओळखून हा प्रकल्प तात्काळ मंजूर केला. सुमारे 14 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प नांदेडच्या उद्योग, व्यापार विश्वाला नवे आयाम तसेच प्रवाशांना सुविधा मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी नुकताच औरंगाबाद-पुणे नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग जाहीर केला आहे. त्यामुळे भविष्यात नांदेड-जालना समृद्धी महामार्गाने पुढे औरंगाबाद व तिथून पुण्याला कमीत कमी वेळेत जाणे शक्य होणार आहे. हे दोन्ही प्रकल्प नांदेडच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

नांदेड हा 16 तालुक्यांचा मोठा भौगोलिक विस्तार असलेला आणि वैविध्यपूर्ण जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्याच्या सर्व भागात आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय व विकासाच्या योजना पोहोचाव्यात, यासाठी प्रशासन काम करते आहे. जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी या जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून, पालकमंत्री म्हणून मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्याच्या विकासात भविष्यातील गरजांचाअंतर्भाव करून ज्या काही अत्यावश्यक सेवा- सुविधा उपलब्धकरता येतील, त्यावर आपण भर देत आलो आहोत. विकास हा नेहमी सर्वव्यापी व सर्वसमावेशक असला पाहिजे हा आमचा आग्रह आहे. किनवट, माहूरसारख्या आदिवासी भागापासून नांदेडसारख्या शहरातील नागरिकांमध्ये ‘राज्याच्या विकास यात्रेचा मी एक प्रवासी आहे’, अशी भावना निर्माण झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. अश्विनी जगताप यांनी केले पथसंचलनाचे नेतृत्व

May be an image of 2 people, people standing and outdoors

परेड कमांडर पोलिस उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप आणि सेंकड इन परेड कमांडर राखीव पोलिस निरिक्षक विजय धोंडगे यांच्या नेतृत्वात केंद्रीय राखीव पोलिस दल मुदखेड, सशस्त्र पोलिस पथक, सशस्त्र पोलिस पथक (पुरूष)  पोलिस मुख्यालय नांदेड, सशस्त्र महिला पोलिस पथक नांदेड, महाराष्ट्र सुरक्षा बल, पुरूष  गृहरक्षक दल पथक, महिला गृहरक्षक दल पथक नांदेड, पोलिस बँड पथक, डॉग स्कॉड युनिट, बॉम्ब शोधक व नाशक पथक, मार्क्स मॅन, बुलेट रायडर, मिनी रेक्स्यु फायर टेंडर (देवदूत) हे पथसंचलनात सहभागी होते. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कवायतीचे निरिक्षण केले.

May be an image of 5 people, people standing and outdoors

याप्रसंगी शिक्षण विभागामार्फत महाराष्ट्र दर्शन, देखावा सादरीकरण करण्यात आले. सांदीपानी शाळा. श्री किड्स किंगडम स्कुल विद्यार्थ्यांनी  छत्रपती शिवाजी महाराज देखावा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. जि.प.हायस्कुल वाघी येथील विद्यार्थ्यांनी बंजारा नृत्य सादर केले. पोतदार इंग्लिश स्कुलच्या येथील विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले. कै.नाना पालकर विद्यालयातील रचिता येडके या लहान मुलीने शेतकरी नृत्य सादर केले. ज्ञान भारती विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार शाहु, फुले आंबेडकर यांचे दर्शन उपस्थितांना घडविले. ऑक्सफोर्ड द ग्लोबल स्कुल येथील विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा सादर केली. ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कुल येथील विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्याक्षिक सादर केले.

महाराष्ट्र दिनाचे  औचित्य साधून यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.  यात जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आदर्श तलाठी पुरस्कार विजय जयराम रणविर, पोलिस दलात उकृष्ट सेवेबद्ल पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र सहा.पोलिस निरीक्षक पांडुरंग दिगांबर भारती, गंगाराम हनमंतराव जाधव, शेख चांद शे.अलीसाब, मोटार परिवहन विभागाचे शिवहार शेषेराव किडे, राजेंद्र राजलिंग सिटीकर, दिपक रघुनाथराव ओढणे, दिनेश रामेश्वर पांडे, समिरखान मुनिरखान पठान, दीपक राजाराम पवार, दीपक दादाराव डिकळे, दत्ता रामचंद्र सोनुले, सहा.पोलिस उपनिरिक्षक संभाजी संग्राम गुट्टे यांना देण्यात आले.  वृक्षारोपण व पर्यावरण विषयावर उत्तम कामगिरी करणारे परमेश्वर पौळ,  नांदेड जिल्हा पोलिस दलाला सीएसआर 20 दुचाकी वाहने दिल्याबद्ल कमल किशोर कोठारी यांचाही  पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.