मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत

औरंगाबाद ,३० एप्रिल  /प्रतिनिधी :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्याच्या सभेसाठी औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. औरंगाबादच्या क्रांती चौकात दाखल झाल्यानंतर त्यांचं मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचं औक्षण केले . त्यानंतर ते आपल्या मुक्कामस्थळी म्हणेज रामा इंटरनॅशनल हॉटेलकडे रवाना झाले.

मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. त्यातच राज ठाकरेंच्या उद्याच्या औरंगाबादेमध्ये होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेसाठी राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये पोहोचले असून मनसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे. ढोल आणि ताशाच्या गजरात राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.  

Image

राज ठाकरे यांच्या या सभेआधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न मनसेनं केला आहे. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. याबरोबरच राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू असून सभेच्या प्रचारासाठी भोंगे लावलेल्या रिक्षांमार्फत शहरात या सभेचा प्रचार करण्यात येणार आहे. याच प्रचार रिक्षांचा आज मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.   

May be an image of 3 people, people standing and people sitting

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेसाठी जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. पुण्यात 100 पुरोहितांच्या मंत्रोच्चारात राज ठाकरे यांना आशीर्वाद देण्यात आला. राज यांना भगव्या रंगाची शाल देऊन, हार घालण्यात आला. राज यांच्या सभेसाठी आणि राजकीय यशासाठी 100 पुरोहितांनी आशीर्वादाचे मंत्रोच्चार केले. राज यांच्या कारवर पुष्पवृष्टीही करण्यात आली. राज ठाकरे आज सकाळी पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. त्याआधी आशीर्वादाचा हा सोहळा पार पडला. 

शेकडो तरुणांचा ‘मनविसे’मध्ये प्रवेश

May be an image of 6 people, beard, people standing and flower

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शहरातील शेकडो तरुणांनी ‘मनविसे’मध्ये प्रवेश केला. ‘सिल्व्हर इन हॉटेल’च्या सभागृहात झालेला हा प्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. याप्रसंगी पक्षाचे सरचिटणीस श्री. कीर्तिकुमार शिंदे, मनविसेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजीव जावळीकर आणि शहराध्यक्ष श्री. मंगेश साळवे उपस्थित होते.