राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात:मराठी कलाकार केदार शिंदे आणि अंकुश चौधरी थोडक्यात बचावले

अहमदनगर,३० एप्रिल  /प्रतिनिधी :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबाद येथील सभेला परवानगी मिळाली असली तरी काही अटी – शर्तींची मर्यादा आखून देण्यात आली आहे. अशातच राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

हा अपघात अहमदनगरच्या पुढे घोडेगाव जवळ झाला असून या अपघातात ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांना मागून धडकल्या. त्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक केदार शिंदे आणि कलाकार अंकुश चौधरी यांच्या गाड्याचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. राज ठाकरे यांच्या ताफ्यातील सात ते आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये केदार शिंदे आणि अंकुश चौधरी यांच्या मर्सिडीज गाडीचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने अकुंश चौधरी आणि केदार शिंदे या अपघातातून बचावले आहेत. दोन्ही दिग्गज कलाकार हे सुखरुप आहेत.

राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेआधी राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. राज ठाकरे शुक्रवारी पुण्यात दाखल झाले होते. त्यानंतर आज ते पुण्याहून औरंगाबादच्या दिशेला रवाना झाले. राज ठाकरे यांनी ठरल्याप्रमाणे आज सकाळी पुण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते औरंगाबादच्या दिशेला रवाना झाले. त्यांच्यासोबत जवळपास 30 ते 40 गाड्यांचा मोठा ताफा औरंगाबादच्या दिशेला रवाना झाला होता. या दरम्यान औरंगाबादपासून 20 किमी अंतरावर असताना सात ते आठ गाड्यांचा अपघात झाला. या गाड्या हायवेवर प्रचंड वेगात होत्या, अशीदेखील माहिती समोर येत आहे.