राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच, आता फैसला सोमवारी

मुंबई,३० एप्रिल  /प्रतिनिधी :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरल्यानंतर अटक करण्यात आलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारची तारीख दिली होती. मात्र राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शुक्रवार ऐवजी आज शनिवारी सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने सोमवारपर्यंत राणा दामप्त्याचा निकाल राखून ठेवल्याने त्यांना सलग दुसऱ्या दिवशीही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे याप्रकरणी राणा दाम्पत्याचा फैसला सोमवारी होणार आहे.

२३ एप्रिल रोजी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा केली. यामुळे राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आणि शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या आंदोलन केले. तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. अखेर मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे राणा दाम्पत्याने व्हिडीओ जारी करत आपली घोषणा मागे घेतली. त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्यास अटक केली आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत.

तुरुंगातलंच जेवण करा!

आपल्याला तुरुंगात घरचे जेवण मिळावे यासाठी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे.