तीन हजारांची लाच स्‍वीकारणाऱ्याला सहा महिने कारावास आणि तीन हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा

औरंगाबाद ,३० एप्रिल  /प्रतिनिधी :- ईपीएफची अग्रीम रक्कम ईपीएफ कार्यालयातून मंजूर करुन देण्‍यासाठी सहकारी वॉर्ड बॉय कडून तीन हजारांची लाच स्‍वीकारणाऱ्याला सहा महिने कारावास आणि तीन हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश ए.ए. कुलकर्णी यांनी ठोठावली. शकील शेरखी पठाण (३७, रा. करमाड) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात राजु शांताराम नाडे (४३, रा. श्रध्‍दा कॉलनी, एन-२ सिडको, मुकुंदवाडी) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, फिर्यादी व आरोपी हे दोघे सेठ नंदलाल धूत हॉस्‍पीटलमध्‍ये वार्डबॉय म्हणुन कामावर होते. १७ जून २०१७ रोजी फिर्यादीने प्‍लॉट घेण्‍यासाठी कर्मचारी भविष्‍य निधीतून पैसे काढण्‍याचे ठरवले. त्‍यासाठी त्‍यांनी फार्म क्रं.३१ भरुन २० जून २०१७ रोजी ईपीएफ कार्यालयात जमा केला. त्‍यावेळी आरोपी शकील पठाण याने ईपीएफ अग्रीम अर्ज मंजुर करुन देतो म्हणत, पाच हजारांची लाच फिर्यादीला मागितली. मात्र फिर्यादीने पैसे देण्‍यास नकार दिला. त्‍यानंतर फिर्यादीचा अर्ज नामंजूर झाला.

१२ जुलै २०१७ रोजी फिर्यादीने ईपीएफ मधूनपैसे काढण्‍यासाठी पुन्‍हा अग्रीम अर्ज भरला. २० जुलै २०१७ रोजी फिर्यादीला आरोपी भेटला व आता पण तु नविन अर्ज दिलेला आहे, तो रिजेक्ट होऊ द्यायचा नसेल तर त्‍यासाठी ईपीएफ कार्यालयातील लोकांना तीन हजार रुपये द्यावी लागतील, पैसे दिल्या शिवाय तुझे काम होणार नाही असे आरोपीने सांगितले. त्‍यावर फिर्यादीने सध्‍या पैसे नाही, ईपीएफ ची रक्कम भेटल्यानंतर पैसे दतो असे आरोपीला सांगितले. २९ जुलै २०१७ रोजी फिर्यादीच्‍या बँक खात्‍यावर ईपीएफची अग्रीम रक्कम जमा झाली. आरोपीने त्‍यांच्‍याकडे लाचेच्‍या रक्कमेची मागणी केली. फिर्यादीला लाच देण्‍याची इच्‍छा नसल्याने त्‍यांनी एसीबीत तक्रार नोंदवली. एसीबीने तक्रारीची शहानिशा करुन आरोपीला लाच स्‍वीकारतांना पकडले. या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी शकील पठाण याला दोषी ठरवून लाचलूचपत प्रतिबंधक कायद्याच्‍या कलम ८ अन्‍वये सहा महिने साधा कारावास तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या तत्कालीन उपनिरीक्षक विजयमाला चव्हाण आणि हवालदार बाळू थोरात यांनी काम पहिले.