अपशब्द वापरून अपमान करणाऱ्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आदिवासी महिलांचा वैजापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा

वैजापूर,३० एप्रिल  /प्रतिनिधी :-तक्रार देण्यासाठी आलेल्या आदिवासी महिलांबाबत अपशब्द वापरुन समाजाचा अपमान करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवावा या मागणीसाठी आदिवासी महिलांनी शनिवारी वैजापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढुन निदर्शने केली. दोन दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास आदिवासी बांधव धरणे आंदोलन करतील असा इशारा मोर्चेकऱ्यांनी यावेळी दिला. 

पोलिस निरीक्षक सम्राट सिंह राजपूत यांनी घटनेचा अहवाल वरिष्ठांना पाठवून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी माघार घेतली. माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी मध्यस्थी केली. आदिवासी समाजातील महिला एका भांडणाच्या प्रकरणात शुक्रवारी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्या असता त्यावेळी पोलिस ठाण्यात उपस्थित दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी या महिलांबाबत अपशब्द वापरुन समस्त आदिवासी समाजाचा अपमान केला ही अतिशय निंदनीय बाब आहे असे निवेदनात म्हटले आहे. या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याखाली कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर संदिप गायकवाड, मदन पवार, सुनील सोनवणे, अनिल बर्डे, सचिन मोरे, कैलास माळी, नगरसेवक सखाहरी बर्डे, किरण गांगुर्डे आदींसह महिलांच्या सह्या आहेत.