घनसावंगीमधील प्रलंबित जलसिंचन प्रकल्पांना गती द्या – जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई,२८ एप्रिल  /प्रतिनिधी :-जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील प्रलंबित जलसिंचन प्रकल्पांना गती द्यावी, अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिल्या.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील प्रलंबित जलसिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे पाठपुरावा करीत आहेत. यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, मुख्य अभियंता अतुल कपोले, उपसचिव अमोल फुंदे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले की, मौजे गुंज येथे बंधारा बांधण्याची गरज आहे. त्यानुसार हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी. गोदावरी किनारा लगत असलेल्या गावांमध्ये घाट आणि संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला गती द्यावी.

अंबड तालुक्यातील गव्हाची मध्यम प्रकल्पात पाणी सोडणे आणि रांजणी वाडी येथील बंधारा दुरुस्ती करण्याची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. मौजे शिंदेवड आणि रांजणी वाडी येथे साठवण तलाव उभारण्याकरिता प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत कार्यवाही करावी, अशाही सूचना श्री. पाटील यांनी दिल्या.