तब्बल १८ दिवसांनंतर सदावर्ते यांची सुटका

मुंबई,२६ एप्रिल /प्रतिनिधी :-  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवास्थानावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते अखेर १८ दिवसांनी तुरुंगातून बाहेर आले आहेत. सदावर्तेंना ८ एप्रिल रोजी मुंबईतील त्यांच्या निवास्थानातून सिल्व्हर ओक येथील हल्ल्यामागे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे माथी भडकवल्याचा आरोप करत अटक करण्यात आली होती. मात्र, आता अखेर तब्बत १८ दिवसांनी सदावर्ते बाहेर आले आहेत. तुरुंगातून सुटका होताच सदावर्तेंनी हा हिंदुस्थान्यांचा विजय असल्याचे म्हटले आहे.

तुरुंगातून बाहेर पडताना सदावर्ते म्हणाले की, या कठीण काळात माझा मित्र परिवार, हिंदुस्थानातील जनता आणि कष्टकरी बांधन माझ्यासोबत राहिले. तसेच येथून आमचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम जेजे करता येईल ते आम्ही करू. परंतु जय श्री राम म्हणणारे जय भीम म्हणणारे आणि हम है हिंदुस्थानी म्हणणारे जिंकत असतात अशा घोषणा सदावर्ते यांनी यावेळी दिल्या. हा विजय हिंदुस्थान्यांचा आणि कष्टकरी बांधवांचा आहे.

जेलमध्ये गुणरत्न सदावर्ते केवळ ज्युसवर!

गुणरत्न सदावर्ते सध्या आर्थर रोड जेलमध्ये असून त्यांचे सध्या उपोषण सुरू आहे. मागच्या १५ दिवसांपासून सदावर्ते जेवत नसून ते ज्या ज्या पोलीस ठाण्याच्या कोठडीत होते, तिकडचे पोलीस वेळोवेळी सदावर्तेंना अन्न ग्रहण करण्याची विनंती करत होते. मात्र सदावर्ते सकाळ-संध्याकाळ केवळ ज्युस पित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आत्तापर्यंत गावदेवी, सातारा, कोल्हापूर पोलिसांनी सदावर्तेंची कोठडी घेतली होती.

सदावर्ते सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. तिथे त्यांनी जेवण न करण्याचे ठरवले आहे. सरकारी वकील अरुणा पै यांनी ही माहिती दिली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या हिंसक आंदोलन प्रकरणात वकील गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर केला असला तरी इतर गुन्ह्यांमधून त्यांची सुटका झालेली नाही. गुणरत्न सदावर्ते यांची रवानगी पुन्हा एकदा आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यातल्या विद्यापीठ पोलीस ठाण्यात वकील गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे पोलिसांनी ताब्यात घेण्याचा अर्ज केला होता, मात्र त्यांच्याकडे हा ताबा देण्यात आलेला नाही. पुढील कारवाई मुंबईतून होईल, असे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे.