नवनीत राणा यांना कोठडीत हीन वागणूक देण्याचा प्रकार घडलेला नाही – गृहमंत्री

राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम २९ एप्रिलपर्यंत वाढला!

मुंबई : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी कोठडीत हीन वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. यासंदर्भात बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राणांच्या आरोपांसंदर्भात स्वत: चौकशी केल्याचे सांगितले. तसेच, त्या आरोप करत आहेत, तसे काहीच घडले नसून त्यांच्यासोबत कोणतीही हीन वागणूक देण्याचा प्रकार घडलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राणा दाम्पत्यावर आतापर्यंत झालेली कारवाई पूर्णपणे कायदेशीर आहे. याबाबत मी अधिक बोलणार नाही. कारण त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली आहे आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत तथ्यावर आधारित माहिती आमच्याकडे मागितली आहे. ती माहिती लवरकच पाठवण्यात येईल”, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

राणा दाम्पत्याचा कारागृहातील मुक्काम २९ एप्रिल पर्यंत

राजद्रोहाच्या आरोपात अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या राणा दाम्पत्याच्या अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत राणा पती-पत्नीला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामिन अर्जावर २९ एप्रिलपर्यंत राज्य सरकारने उत्तर द्यावे, त्यानंतर अर्जावर सुनावणी घेण्याची तारीख ठरवली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा कारागृहातील मुक्काम २९ एप्रिल पर्यंत वाढला आहे.

मुंबई पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत राणा दाम्पत्याला अटक केली आहे. अटकेसाठी गेलेल्या पोलिसांसोबत हुज्जत घातली, त्यांना धक्काबुक्की केल्याचा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात कलम ३५३ गुन्हा दाखल करण्यात आला. याची नोंद वेगळ्या एफआयआरमध्ये करण्यात आली आहे.