पोहण्यासाठी गेलेल्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या वडिलांसह मुलाचाही मृत्यू

जालन्याच्या मोती तलावावर हृदयद्रावक घटना 

जालना,२६ एप्रिल  /प्रतिनिधी :- जालन्याच्या मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या  मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या वडिलांसह मुलाचाही मृत्यू झाला. वेळीच प्रसंगावधान राखल्याने दोन मुले वाचली.अग्निशमन दलाच्या मदतीने नागरिकांनी मृतदेह बाहेर काढले
जालना शहरातील मोती तलावात माणिक बापूराव निर्वळ हे मंगळवार दि 26 रोजी दुपारी 4.30 वा. आपल्या तीन मुलांना सोबत पोहण्यासाठी घेऊन गेले होते. मोठा मुलगा आकाश  (वय १४) हा पोहत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडून गटांगळ्या खाऊ लागला. तेवढ्यात त्याला वाचविण्यासाठी वडील माणिक आहे त्याच्याजवळ गेले होते, त्यादरम्यान आकाशने वडिलांच्या गळ्याला मिठी मारल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले. माणिक निर्वळ यांची 12 आणि 10 वर्षाची दुसरी दोन्ही मुले जवळच पोहत होती,  त्यांच्या हा प्रकार लक्षात येताच ते तातडीने पाण्याबाहेर आले. त्यांनी वडील आणि भावाच्या मदतीसाठी मोठ्यांनी आरडाओरडा करून लोकांना बोलावले. या दोघा बापलेकांचे मृतदेह पाण्यातील गाळात फसले होते, त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले.अग्निशमन दल, चंदनझिरा पोलीस आणि नागरिकांनी प्रयत्न करून एक तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

         

माणिक बापूराव निर्वळ (वय 36) यांचं कुटुंब परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील धर्मापुरी येथील आहे. माणिक यांची सासुरवाडी जालना असल्याने ते जालना येथे कामानिमित्त कुटुंबासह काही वर्षांपासून आले होते. अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील एका लोखंड कारखान्यात कुटुंबासह राहून, ते मजुरी करीत होते. आज त्यांना सुट्टी असल्याने, ते आपल्या तीन मुलांना पोहणे शिकविण्यासाठी मोती तलावावर गेले होते, तेथे ही हृदयद्रावक घटना घडली. याप्रकरणी ​मृत ​माणिक निर्वळ यांचे मेव्हणे बंडू खरात (रा. जयभवानीनगर, जालना) यांच्या माहितीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.