धर्माची चिकित्सा केल्याने बाबासाहेबांनी महात्मा फुले यांना गुरू मानले – प्रा. रावसाहेब कसबे

वैजापूर,२६ एप्रिल  /प्रतिनिधी :- महात्मा जोतिबा फुले हे आधुनिक भारताचे जनक असून, जगात सर्वप्रथम धर्माची चिकित्सा केली म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी फुले यांना आपले गुरू मानले असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत प्रा. रावसाहेब कसबे यांनी येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात आयोजित तीन दिवशीय फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना केले.


” सद्य स्थिती व फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची  प्रासंगिकता ”  या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,”जोतिबा फुले यांनी जुने सर्व ग्रंथ नाकारले व पर्यायी व्यवस्था म्हणून आधुनिक तत्व,;विचार व संस्कृती समाजाला प्रदान केली.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर एकमेव महापुरुष की ज्यांनीभारतातील महिलांना  मतदानाचा हक्क मिळवून दिला.असेही ते पुढे म्हणाले त्यानी विदेशातील अनेक देशांचे  दाखले दिले ज्यांनी महिलांना तुच्छ लेखून मतदान अधिकार दिले नाही किंवा स्त्री – पुरुष समानता देण्यात खूप उशीर केला,विश्व निर्मिती बाबत त्यांनी स्पष्ट केले की, विश्व निर्मितीचे प्रमुख केंद्र ईश्वर नसून मानव आहे, बाबासाहेब आंबेडकर हे जगाला फार उशिरा कळाले. सत्तर वर्षानंतर संपूर्ण जगाने बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यास प्रारंभ केला. युनोने ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यास प्रारंभ केला.बाबासाहेबांचे सर्वसमावेशक विचार समजून घेतल्या शिवाय तरणोपाय नाही असेही कसबे पुढे म्हणाले.

या समयी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून महाविद्यालय विकास समिती सदस्य उल्हास ठोंबरे होते. आनंदीताई अन्नदाते, डॉ.निलेश भाटिया, बालसाहित्यिक ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, माजी प्राचार्य बी.एस.जाधव, प्राचार्य शिवाजीराव थोरे यांनी कै.विनायकराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. उपप्राचार्य डॉ. महेश खरात व डॉ.एस.डी. परदेशी यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. प्रास्ताविक डॉ.महेश खरात यांनी केले.डॉ. ज्ञानेश्वर खिल्लारी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.सुत्रसंचलन प्रा. बाबासाहेब गमले यांनी तर आभार प्रा.राजेश कोळेकर यांनी मानले.