कोरोना प्रयोगशाळांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकारी

चाचणी प्रक्रिया गतिमान व व्यापक करावी – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 20 : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अधिक परिणामकारक करण्यासाठी व कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळांच्या कामकाजात अधिकाधिक सुसूत्रता आणण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. प्रयोगशाळांचे कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिले.

कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळांच्या कामकाजात अधिकाधिक सुसूत्रता आणणे व या प्रयोगशाळांचे कामकाज अधिक प्रभावीपणे राबविणे, यासाठी राज्यस्तरावर एक नोडल अधिकारी तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर प्रत्येकी एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा शासनाचा निर्णय आहे. कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा संदर्भातील कामकाजासाठी राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून हाफकिन बायोफार्मास्युटिकल्सच्या व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरही नोडल अधिकारी नेमण्यात आले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, सुरुवातीच्या काळात स्थानिक स्तरावर चाचणी अहवाल प्राप्त करून घेण्यासाठी प्रयोगशाळा नसल्याने गतीने प्रक्रिया राबवून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. त्यातील चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, अँटीजेन टेस्टही केल्या जात आहेत. या सर्व कामांत एकसूत्रता ठेवून प्रतिबंधक उपाययोजनांना गती देण्याच्या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालय व प्रयोगशाळा यांच्यातील समन्वय अधिकाधिक प्रभावी राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

तपासणी व चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे जेणेकरून चाचण्यांची एकूण संख्या अधिकाधिक वाढेल,  प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहतील याची खबरदारी घेणे, संबंधित रुग्णालयांकडून प्रयोगशाळांकडे रुग्णांचे घेण्यात आलेले नमुने वेळेवर पोहोचतील याबाबत खातरजमा करणे, रुग्णांचे नमुने घेताना विहित नमुन्यातील फॉर्ममध्ये रुग्णाचे नाव, पत्ता तसेच संपर्क क्रमांक अचूकपणे भरण्यात येत आहे, याची खातरजमा करणे, आदी जबाबदा-या नोडल अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्या आहेत.

त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील सर्व प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने सर्व दिवशी कार्यरत राहतील, याची दक्षता घेणे, नमुना प्राप्त झाल्यानंतर कमाल 24 तासात त्याबाबतच्या चाचण्यांचे अहवाल उपलब्ध होतील, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणे, प्रयोगशाळेतील मनुष्यबळ व संसाधने पर्याप्त प्रमाणात उपलब्ध राहतील,याची दक्षता घेणे,  ज्या रुग्णांच्या बाबतीत चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, असे अहवाल संबंधित रुग्णालयाला तात्काळ उपलब्ध होतील, यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, पॉझिटिव्ह रुग्णांबाबतची विहित नमुन्यातील माहिती आयसीएमआर पोर्टल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे पोर्टल व अन्य आवश्यक त्या ठिकाणी त्याच दिवशी अपलोड करणे,  निगेटिव्ह रुग्णांबाबतची एकत्र यादी तयार करणे व ही यादी त्याच दिवशी संबंधित रुग्णालयांना पाठविणे, ज्या जिल्ह्यातील रुग्णांचे नमुने अन्य जिल्ह्यातील प्रयोगशाळांकडे चाचणीसाठी पाठविण्यात येत आहेत, अशा प्रकरणात योग्य तो समन्वय राखण्याची जबाबदारी संबंधित दोन्ही जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांची असेल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *