महराष्ट्रात आघाडीवर असलेल्या महिला मागे, ही चिंतेची बाब -राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद  यांचा 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी संदेश

नवी दिल्ली ,२४ एप्रिल  /प्रतिनिधी :- राष्ट्रपती रामनाथ कोविंद  यांनी आज (24 एप्रिल, 2022) दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात आपला संदेश दिला.

या साहित्य संमेलन परिसराला भारतरत्न लता मंगेशकर यांचे नाव दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. भारत आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या कालातीत वारसा असलेल्या लता मंगेशकर यांचे नाव या साहित्य परिसराला देणे, हे औचित्यपूर्ण आहे, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे, उदयगिरी महाविद्यालय यंदा आपला हीरक महोत्सव साजरा करत आहेयाचा उल्लेख करत, राष्ट्रपतींनी शिक्षण क्षेत्रात गेली साठ वर्षे महत्वाचे योगदान दिल्याबद्दल या महाविद्यालयाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. या महाविद्यालायची स्थापना, उदगीर प्रदेशातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या स्वकष्टार्जित कमाईतून केली होती,याचा उल्लेख करत, जेव्हा सर्वसामान्य लोक असे असामान्य योगदान देतात, तेव्हाच समाज आणि राष्ट्र तेव्हाच प्रगती करु शकतात. असे राष्ट्रपती म्हणाले.

समानता आणि शौर्य ही महाराष्ट्राची ओळख आहे. 17 व्या शतकात, शौर्य आणि ज्ञानाची गंगा प्रवाहित करत, छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी आणि संत तुकाराम यांनी मराठी साहित्य आणि मराठी ओळख देशभर अधोरेखित केली, ज्यातून केवळ महाराष्ट्रच नव्हे; तर भारताचाही स्वाभिमान उंचावला, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

महराष्ट्रात प्राचीन काळापासून राजकारण, समाजसुधारणा, वैचारिक विश्व आणि साहित्य यात  आघाडीवर असलेल्या महिला, आज मात्र मागे पडल्या आहेत, ही चिंतेची बाब असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्र स्त्री शिक्षणात 14 व्या स्थानी तर, स्त्री-पुरुष लैंगिक गुणोत्तरात 22 व्या स्थानी होता, असे त्यांनी नमूद केले. या साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या सर्व प्रागतिक विचारांच्या नागरिकांनी महिलांना, आरोग्य, शिक्षण आणि साहित्य अशा क्षेत्रांत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याची प्रतिज्ञा करावी, असे आवाहन राष्ट्रपती कोविंद  यांनी केले.