मन की बात: डिजिटल व्यवहार झाला अर्थव्यवस्थेचा भाग- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली ,२४ एप्रिल  /प्रतिनिधी :- ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, देशाला नवीन संग्रहालय मिळालं आहे. पीएम म्युझियममधून जनतेला पंतप्रधानांशी संबंधित रंजक माहिती मिळत आहे. त्यामुळे इतिहासाबद्दल लोकांची आवड वाढली आहे.

पंतप्रधान यावेळी म्हणाले की, ‘तंत्रज्ञानाची ताकद सामान्य लोकांचे जीवन कसे बदलत आहे. तंत्रज्ञानामुळे आपण आपल्या आजूबाजूला अनेक बदल झालेलं पाहायला मिळत आहे. डिजिटल पेमेंटमुळे कॅशलेस व्यवहाराला चालना मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत भीम यूपीआय (BHIM UPI)  झपाट्याने आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि सवयींचा एक भाग बनला आहे. आता छोट्या शहरांमध्ये आणि बहुतांश गावांमध्येही लोक UPI द्वारेच व्यवहार करण्यात येत आहेत.’डिजिटल अर्थव्यवस्थेमुळे देशात एक संस्कृती जन्माला येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले आहेत. रस्त्याच्या कोपऱ्यातील छोट्या दुकानांमध्ये डिजिटल पेमेंट आल्याने त्यांच्यासाठी अधिकाधिक ग्राहकांना सेवा देणे सोपे झाले, आणि आता त्यांना खुल्या पैशाचीही अडचण नाहीये.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, पाण्याची उपलब्धता आणि पाण्याची कमतरता यावरून कोणत्याही देशाची प्रगती आणि गती ठरते. त्यामुळे स्वच्छतेसारख्या विषयांसोबतच जलसंधारणाचा मुद्दा ‘मन की बात’मध्ये वारंवार उपस्थित करणे गरजेच आहे. देशातील बहुतांश भागात उष्णता झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची बचत करण्याची आपली जबाबदारीही तितकीच वाढली आहे. तुम्ही आता जिथे आहात तिथे भरपूर पाणी उपलब्ध असू शकते. पण, पाण्याचा ताण असलेल्या भागात राहणार्‍या करोडो लोकांचाही तुम्हाला विचार करावा लागेल, ज्यांच्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अमृतसारखा आहे. यामुळेच स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’त जलसंधारण हा एक महत्त्वाचा संकल्प आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (88 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार.

नवीन विषयांसह, नवीन प्रेरक उदाहरणांसह, नवे संदेश सोबत घेऊन, मी पुन्हा एकदा ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यासोबत संवाद साधायला आलो. यावेळी मला कोणत्या विषयासंदर्भात सर्वात जास्त पत्रे आणि संदेश आले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? हा विषय असा आहे, जो इतिहास, वर्तमान आणि भविष्य या तिन्हीशी संबंधित आहेत. देशाला लाभलेल्या नव्या प्रधानमंत्री संग्रहालयाबद्दल मी बोलतो आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, १४ एप्रिल रोजी प्रधानमंत्री संग्रहालय लोकार्पण करण्यात आले. देशातील नागरिकांसाठी ते खुले करण्यात आले आहे. श्री सार्थक जी नावाचे एक श्रोता आहेत.सार्थक जी गुरुग्राममध्ये राहतात आणि पहिली संधी मिळताच ते प्रधानमंत्री संग्रहालय पाहून आले आहेत. नमो अॅपवर सार्थकजींनी मला पाठवलेला संदेश चांगलाच मनोरंजक आहे. त्यांनी लिहिले आहे की ते वृत्तवाहिन्या पाहतात, वर्तमानपत्रे वाचतात, वर्षानुवर्षे सोशल मीडियावरसुद्धा सक्रिय आहेत, त्यामुळे आपल्याकडे पुरेसे सामान्य ज्ञान आहे, असे त्यांना वाटत होते. पण जेव्हा त्यांनी प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट दिली, तेव्हा त्यांना खूपच आश्चर्य वाटले. आपल्याला आपल्या देशाबद्दल आणि देशाचे नेतृत्व करणाऱ्यांबद्दल फारशी माहिती नाही, हे त्यांच्या लक्षात आले. प्रधानमंत्री संग्रहालयातील अशा काही गोष्टींबद्दल त्यांनी लिहिले आहे, ज्या त्यांची उत्सुकता वाढवणाऱ्या होत्या. लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या सासरच्या मंडळींनी भेट म्हणून दिलेला चरखा पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी शास्त्रीजींचे पासबुक देखील पाहिले आणि त्यांच्याकडे बचत म्हणून किती कमी रक्कम होती, हे सुद्धा त्यांनी पाहिले. स्वातंत्र्यलढ्यात उतरण्यापूर्वी मोरारजीभाई देसाई हे गुजरातमध्ये डेप्युटी कलेक्टर होते, हेही आपल्याला माहीत नव्हते, असे सार्थकजींनी लिहिले आहे. ते प्रदीर्घ काळ प्रशासकीय सेवेत होते. चौधरी चरणसिंग जी यांच्याबद्दल सार्थकजी यांनी लिहिले आहे की जमीनदारी प्रथा निर्मूलनाच्या क्षेत्रात चौधरी चरणसिंग जी यांचे मोठे योगदान होते, हे त्यांना माहित नव्हते. जमीन सुधारणा क्षेत्रात श्री पी.व्ही. नरसिंह राव यांनी खूप रस घेतला होता, हे आपण प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट दिली, तेव्हा समजले, असे सार्थकजींनी लिहिले आहे.  चंद्रशेखरजी यांनी 4 हजार किलोमीटरहून जास्त अंतर पायी चालत भारताचा ऐतिहासिक प्रवास केल्याचे आपल्याला या संग्रहालयात आल्यावरच कळले, असे सार्थकजींनी लिहिले आहे. अटलजींनी वापरलेल्या वस्तू त्यांनी संग्रहालयात पाहिल्या, त्यांची भाषणे ऐकली, तेव्हा त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. या संग्रहालयात महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, जय प्रकाश नारायण आणि आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलही खूप मनोरंजक माहिती असल्याचे सार्थकजींनी पुढे सांगितले आहे.

मित्रहो, देशाच्या पंतप्रधानांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव हाच सर्वात उचित काळ आहे, असे मला वाटते.स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवाला लोक चळवळीचे स्वरूप येते आहे, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. इतिहासाबद्दल लोकांची उत्सुकता बरीच वाढते आहे आणि अशा परिस्थितीत देशाच्या अनमोल वारशाशी जोडणारे हे प्रधानमंत्री संग्रहालय युवा वर्गासाठीही आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

खरे तर मित्रहो, आता तुमच्याशी संग्रहालयाबद्दल इतके काही बोलतो आहे, तर त्याच विषयाशी संबंधित काही प्रश्न तुम्हाला विचारावेत, असे मला वाटते आहे. तुमचे सामान्य ज्ञान काय सांगते, ते पाहू. बघु या, तुम्हाला किती माहिती आहे. माझ्या युवा मित्रमंडळींनो, तयार  आहात का तुम्ही, कागद पेन हातात घेतले का? मी आत्ता तुम्हाला जे प्रश्न विचारणार आहे, त्यांची उत्तरे तुम्ही नमो अॅपवर किंवा सोशल मीडियावर #MuseumQuizसोबत शेअर करू शकता आणि नक्की करा. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यावीत, अशी आग्रहपूर्वक विनंती मी करतो. यामुळे देशभरातील लोकांच्या मनात संग्रहालयाविषयी उत्सुकता वाढीला लागेल. आपल्या देशातील कोणत्या शहरात प्रसिद्ध रेल्वे संग्रहालय आहे, जिथे गेली ४५ वर्षे लोकांना भारतीय रेल्वेचा वारसा पाहण्याची संधी मिळते आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का?मी तुम्हाला आणखी एक संकेत देतो. तुम्ही या ठिकाणी फेयरी क्वीन, प्रिन्स ऑफ वेल्सचे सलून ते फायरलेस स्टीम लोकोमोटिव्ह अशा अनेक बाबी पाहू शकता. मुंबईत असे कोणते संग्रहालय आहे, जिथे आपल्याला चलनाचा प्रवास अतिशय मनोरंजक पद्धतीने पाहायला मिळतो? तुम्हाला ते ठाऊक आहे का? या ठिकाणी ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील नाणी आहेत आणि दुसरीकडे ई-मनी सुद्धा उपलब्ध आहे. आपला तिसरा प्रश्न ‘विरासत-ए-खालसा’ या संग्रहालयाशी संबंधित आहे. हे संग्रहालय पंजाबमधील कोणत्या शहरात आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला सगळ्यांना पतंग उडवायला आवडते. हो ना? पुढचा प्रश्न पतंगाशीच संबंधित आहे. देशातले एकमेव पतंग संग्रहालय कोठे आहे? चला, मी तुम्हाला एक संकेत देतो. या ठिकाणी ठेवलेल्या सर्वात मोठ्या पतंगाचा आकार 22 बाय 16 फूट आहे. काही आठवतंय का–बरं, नाही तर – आणखी एक गोष्ट सांगतो–हे संग्रहालय ज्या शहरात आहे, त्या शहराचे बापूंशी विशेष नाते आहे. लहानपणी सगळ्यांनाच टपाल तिकिटे गोळा करण्याचा छंद असतो. पण भारतातील टपाल तिकिटांशी संबंधित राष्ट्रीय संग्रहालय कोठे आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो. गुलशन महल नावाच्या इमारतीमध्ये कोणते संग्रहालय आहे? तुमच्यासाठी संकेत असा आहे की या संग्रहालयामध्ये तुम्ही चित्रपटाचे दिग्दर्शकही होऊ शकता, कॅमेरा, एडिटिंगचे बारकावेही पाहू शकता. बरं. भारताचा वस्त्रोद्योगाचा वारसा जपणारे संग्रहालय तुम्हाला माहीत आहे का? या संग्रहालयात मिनिएचर पेंटिंग्ज, जैन हस्तलिखिते, शिल्पे आणि असे बरेच काही आहे. हे संग्रहालय आपल्या उत्कृष्ट सादरीकरणासाठीही चांगलेच प्रसिद्ध आहे.

मित्रहो, तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे शोधणे खूपच सोपे आहे. आपल्या नवीन पिढीला संग्रहालयांबद्दल कुतूहल वाटले पाहिजे, या विचारातून मी हे प्रश्न विचारले. त्यांनी संग्रहालयांबद्दल जास्तीत जास्त वाचावे, तिथे भेट द्यावी, असे मला वाटते. संग्रहालयांचे महत्त्व ओळखून अनेक लोक स्वतः पुढाकार घेत आहेत आणि संग्रहालयांना मोठ्या प्रमाणावर देणग्याही देत आहेत. बरेच लोक आपले जुने संग्रह, तसेच आपल्याकडच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयांना दान करत आहेत. जेव्हा तुम्ही असे करता, तेव्हा तुम्ही संपूर्ण तुमच्याकडचा सांस्कृतिक वारसा समाजापर्यंत पोहोचवता. भारतातही आता लोक यासाठी पुढाकार घेत आहेत. वैयक्तिक पातळीवरच्या अशा सर्व प्रयत्नांचे सुद्धा मी कौतुक करतो. आज बदलत्या काळात आणि कोविड संबंधी नियमांमुळे संग्रहालयांमध्ये नवीन पद्धतींचा अवलंब करण्यावर भर दिला जात आहे. संग्रहालयांमध्ये डिजिटायझेशनवरही भर देण्याचे प्रमाण वाढले आहे. 18 मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा केला जाणार आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हे लक्षात घेत, मला माझ्या युवा सहकाऱ्यांना काही सुचवावेसे वाटते. येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसह स्थानिक संग्रहालयाला भेट देऊ शकता. तुमचा अनुभव #MuseumMemoriesसह शेअर करा. तुम्ही असे करू शकलात तर इतरांनाही संग्रहालयांविषयी कुतूहल वाटू लागेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेकदा संकल्प केले असतील, ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रमही केले असतील. मित्रांनो, अलीकडेच मला अशाच एका संकल्पाबद्दल माहिती मिळाली, जी खरोखरच अतिशय वेगळी आणि अनोखी होती. म्हणूनच ‘मन की बात’च्या श्रोत्यांना त्याबद्दल सांगावं, असं मला वाटलं.

मित्रहो, कल्पना करा की एखादी व्यक्ती, आपण दिवसभर संपूर्ण शहरात फिरू आणि एकाही पैशाचा व्यवहार रोखीने करणार नाही, असा संकल्प करून आपल्या घरातून बाहेर पडेल. किती वेगळा संकल्प आहे ना हा? सागरिका आणि प्रेक्षा या दिल्लीतल्या दोन मुलींनी असाच कॅशलेस डे आऊटचा प्रयोग केला. सागरिका आणि प्रेक्षा दिल्लीत जिथे जिथे गेल्या, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना डिजिटल पेमेंटची सुविधा मिळाली. UPI QR कोडमुळे त्यांना पैसे काढण्याची गरजच भासली नाही. अगदी रस्त्यावरचे खाद्यपदार्थ आणि फिरत्या विक्रेत्यांकडेही त्यांनी ऑनलाइन व्यवहार सहज करता आले.

मित्रहो, एखाद्याला वाटेल की दिल्ली हे महानगर आहे, तिथे हे अगदी सहज शक्य आहे. पण आता UPI चा वापर फक्त दिल्लीसारख्या मोठ्या शहरांपुरताच मर्यादित असावा, अशी परिस्थिती नाही. गाझियाबादहून आनंदिता त्रिपाठी यांचाही एक संदेश मला मिळाला आहे. आनंदिता गेल्याच आठवड्यात आपल्या पतीसोबत ईशान्य भागात गेल्या होत्या. आसाम ते मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातील तवांग पर्यंतच्या आपल्या प्रवासाचा अनुभव त्यांनी मला सांगितला. कित्येक दिवसांच्या या प्रवासात त्यांना अगदी दुर्गम भागातही पैसे देण्याची गरज भासली नाही, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी इंटरनेटचीही चांगली सुविधा नव्हती, तिथे आता UPI द्वारे पैसे भरण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. सागरिका, प्रेक्षा आणि आनंदिता यांचे अनुभव पाहता, मी तुम्हालाही कॅशलेस डे आऊटचा प्रयोग करून पाहण्याची विनंती करेन, तुम्ही हे नक्की करून बघा.

मित्रहो, गेल्या काही वर्षात भीम UPI हा अगदी झपाट्याने आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि सवयींचा एक भाग बनला आहे. आता छोट्या शहरांमध्ये आणि बहुतेक गावांमध्येही लोक UPI च्या माध्यमातूनच व्यवहार करत आहेत. डिजिटल अर्थव्यवस्थेमधूनही देशात एक वेगळी संस्कृती आकार घेत आहे. गल्लीबोळातल्या छोट्या दुकानांमध्ये डिजिटल पेमेंटमुळे अधिकाधिक ग्राहकांना सेवा देणे सोपे झाले आहे. आता त्यांना सुट्ट्या पैशाचीही समस्या राहिली नाही. रोजच्या जगण्यात तुम्हाला सुद्धा UPI ची सोय जाणवली असेल. कुठेही जा, रोख पैसे बाळगण्याचा, त्यासाठी बँकेत जाण्याचा, एटीएम शोधण्याचा त्रास संपला आहे. मोबाईलवरूनच सगळे व्यवहार केले जातात.परंतु या लहान-सहान ऑनलाईन पेमेंटमुळे देशात किती मोठी डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? आजघडीला आपल्या देशात दररोज सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत. गेल्या मार्च महिन्यात तर यूपीआयच्या माध्यमातून 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे व्यवहार झाले. यामुळे देशात सुविधा वाढत असून, प्रामाणिकपणाचे वातावरणही निर्माण होते आहे. आता फिन-टेकशी संबंधित अनेक नवीन स्टार्टअप्सही देशात पुढे येत आहेत. डिजिटल पेमेंट आणि स्टार्ट-अप इकोसिस्टमच्या या सामर्थ्याशी संबंधित काही अनुभव तुमच्याकडे असल्यास ते आमच्यापर्यंत पोहोचवा, असे मी सांगू इच्छितो. तुमचे अनुभव इतर अनेक देशवासीयांसाठी प्रेरक ठरू शकतात.

माझ्या प्रिय देशवासियांनो, तंत्रज्ञानाचे सामर्थ्य सर्वसामान्य लोकांच्या जीवनात कशा प्रकारे बदल घडवून आणत आहे, हे आपण आपल्या आजूबाजूला सतत पाहत असतो. तंत्रज्ञानाने आणखी एक उत्तम काम केले आहे. आपल्या दिव्यांग सहकाऱ्यांच्या विलक्षण क्षमतेचा लाभ देशापर्यंत आणि जगापर्यंत पोहोचवण्याचे काम तंत्रज्ञान करते आहे. आपले दिव्यांग बंधु भगिनी काय करू शकतात हे टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपण पाहिले आहे. क्रीडा क्षेत्राबरोबरच, कला, शिक्षण आणि इतर अनेक क्षेत्रांत आपले दिव्यांग देशवासीउत्तम कामगिरी करत असतात.परंतु जेव्हा त्यांना तंत्रज्ञानाची साथ मिळते, तेव्हा ते आपल्या कार्यक्षेत्रात आणखी नवी उंची गाठतात. हेच लक्षात घेऊन,दिव्यांगांसाठी उपयुक्त स्रोत आणि पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी देश अलिकडच्या काळात सातत्याने प्रयत्न करत आहे. देशात असे अनेक स्टार्ट अप आणि संस्था आहेत, जे यासाठी प्रेरक कार्य करत आहेत. Voice of specially-abled people ही अशीच एक संस्था आहे, जी सहाय्यक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नव्या संधींना प्रोत्साहन देत आहे. जे कलाकार दिव्यांग आहेत, त्यांचे काम जगासमोर आणण्यासाठी एक अभिनव सुरुवात करण्यात आली आहे. Voice of specially-abled people ने अशा कलाकारांच्या चित्रांचे डिजिटल चित्रदालन तयार केले आहे. दिव्यांग व्यक्ती किती विलक्षण कला गुणांनी समृद्ध असू शकतात आणि त्यांच्यात किती असाधारण क्षमता असू शकते, याचे हे कलादालन उत्तम उदाहरण आहे. दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात कोणती आव्हाने असतात, त्यातून बाहेर पडल्यानंतर ते किती प्रगती करू शकतात, अशा अनेक गोष्टी तुम्हाला ही चित्रे पाहताना प्रकर्षाने जाणवू शकतात. जर तुम्हीही एखाद्या दिव्यांग व्यक्तीला ओळखत असाल, त्यांच्यातले कलागुण ओळखत असाल, तर डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही त्यांना जगासमोर आणू शकता. जे दिव्यांग सहकारी आहेत, त्यांनीही अशा प्रयत्नात आवर्जून सहभागी व्हावे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशात बहुतेक भागात उन्हाळा खूपच वेगाने वाढतो आहे. सतत वाढणाराहा उन्हाळा, पाण्याची बचत करण्याची आपली जबाबदारीही तितकीच वाढवतो. तुम्ही आता जिथे आहात, तिथे कदाचित भरपूर पाणी उपलब्ध असेल.  पण पाण्याची टंचाई असलेल्या भागात राहणार्‍या कोट्यवधी देशवासियांचाही विचार तुम्ही केला पाहिजे, ज्यांच्यासाठी पाण्याचा एक-एक थेंब अमृतासारखा असतो.

मित्रहो, स्वातंत्र्यप्राप्तीच्या या ७५ व्या वर्षात, स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जे संकल्प पूर्ण करण्याची ध्येय बाळगून देश आगेकूच करतो आहे, त्यात जलसंधारणाचा संकल्प महत्वाचा आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या अमृत महोत्सवा दरम्यान देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरे बांधली जाणार आहेत. ही मोहीम किती मोठी आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता. तुमच्याच शहरात ७५ अमृत सरोवरे असतील, असा दिवस आता फार दूर नाही. या मोहिमेबद्दल तुम्ही सर्वांनी आणि विशेषत: युवा वर्गाने जाणून घ्यावे आणि त्याची जबाबदारीही घ्यावी, अशी माझी इच्छा आहे. तुमच्या परिसरात स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित काही इतिहास असेल, एखाद्या स्वांतंत्र्य सेनानीची आठवण असेल, तर तुम्ही ती अमृत सरोवराशी जोडू शकता. अमृत सरोवरांचा संकल्प केल्यानंतर अनेक ठिकाणी यासंदर्भात वेगाने काम सुरू झाले आहे, हे समजल्यावर मला मनापासून आनंद झाला. उत्तर प्रदेशातील रामपूरमधल्या पटवाई ग्रामपंचायतीबद्दल मला माहिती मिळाली आहे. तिथल्या ग्रामसभेच्या जागी तलाव होता, मात्र तो घाणीने आणि कचऱ्याने भरलेला होता. अथक परिश्रम घेऊन, स्थानिक लोकांच्या मदतीने, स्थानिक शाळकरी मुलांच्या मदतीने गेल्या काही आठवड्यांपासून त्या अस्वच्छ तलावाचा आता कायापालट झाला आहे. आता त्या तलावाच्या काठावर संरक्षक भिंत, कुंपण, फूड कोर्ट, कारंजे, दिवे अशा अनेक सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत. हे प्रयत्न करणाऱ्या रामपूरच्या पटवाई ग्रामपंचायतीचे, गावातील लोकांचे, तेथील मुलांचे मी मनापासून अभिनंदन करतो.

मित्रहो, पाण्याची उपलब्धता आणि पाण्याची कमतरता, यावरूनच कोणत्याही देशाची प्रगती आणि गती ठरते. तुमच्या हेही लक्षात आले असेल की ‘मन की बात’ या कार्यक्रमात स्वच्छतेसारख्या विषयांबरोबरच मी जलसंधारणावरही सातत्याने बोलत असतो. आपल्या धर्मग्रंथांमध्ये तर अगदी स्पष्टपणे सांगितले आहे –

पानियम् परमम् लोके, जीवानाम् जीवनम् समृतम् ||

अर्थात, विश्वात पाणीच प्रत्येक जीवाचा, जीवनाचा आधार आहे आणि पाणीच सर्वात मोठे संसाधन देखील आहे, म्हणून तर आपल्या पूर्वजांनी पाण्याचे संरक्षण करण्यावर इतका भर दिला. वेदांपासून ते पुराणांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी पाणी वाचवणे, तलाव, सरोवर बांधणे हे मनुष्याचे सामाजिक आणि अध्यात्मिक कर्तव्य सांगितले गेले आहे. वाल्मिकी रामायणात जल स्रोतांना जोडण्यावर, पाण्याचे संरक्षण करण्यावर विशेष भर दिला गेला आहे.

त्याच प्रमाणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल, सिन्धु – सरस्वती आणि हडप्पा संस्कृतीच्या वेळी देखील भारतात पाण्यासंबंधी किती विकसित अभियांत्रिकी तंत्रज्ञान असायचे. प्राचीन काळात अनेक शहरात जलस्रोतांना एकमेकांना जोडणारी प्रणाली असायची आणि हा तो काळ होता जेव्हा लोकसंख्या इतकी नव्हती, नैसर्गिक संसाधनांची कमतरता देखील नव्हती, एक प्रकारची विपुलता होती, तरी देखील, जलसंरक्षणाच्या बाबतीत तेव्हा जागरूकता जास्त होती. पण आज परिस्थिती ह्याच्या उलट आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या परिसरातल्या अशा जुन्या तलाव, विहिरी आणि सरोवरांविषयी जाणून घ्यावे. अमृत सरोवर अभियानाच्या मुळे जल संरक्षणाच्या सोबतच आपल्या विभागाची ओळख पण निर्माण होईल. ह्यामुळे शहरातून, परिसरांतून स्थानिक पर्यटन स्थळे पण विकसित होतील., लोकांना हिंडायला एक नवीन जागा मिळेल.

मित्रानो, पाण्याशी जोडलेला प्रत्येक प्रयत्न आमच्या भविष्याशी जोडलेला आहे. ह्यात संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. ह्या साठी अनेक शतकांपासून वेगवेगळे समाज निरनिराळे प्रयत्न निरंतर करत आलेले आहेत. जसे, कच्छ च्या रणातील एक ‘मालधारी’ जनजाती जलसंरक्षणासाठी वृदास नावाचा प्रकार वापरते. ह्या प्रकारात लहान लहान विहिरी बनवल्या जातात आणि त्यांच्या संरक्षणासाठी आजूबाजूला झाडेझुडपे लावली जातात.

ह्याच प्रमाणे मध्य प्रदेशातील भील्ल जनजातीने आपल्या एका हलमा नावाच्या ऐतिहासिक परंपरेचा जल संरक्षणा साठी उपयोग केला. ह्या परंपरेच्या अंतर्गत जनजातीचे लोक पाण्यासंबंधीच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी एका ठिकाणी जमतात. हलमा परंपरेने सुचवलेल्या उपायांमुळे ह्या भागातील पाण्याचे संकट कमी झाले आणि भूजलाचा स्तरही वाढला.

मित्रांनो, अशीच कर्तव्यभावना जर सगळ्यांच्या मनात जागृत झाली तर पाणी संकटाविषयी असलेल्या मोठ्यातल्या मोठ्या आव्हानाचे देखील उत्तर सापडू शकेल. चला तर मग, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपण जल संरक्षण आणि जीवन संरक्षणाचा संकल्प करू या. आपण पाण्याचा एक एक थेम्ब वाचवू आणि प्रत्येक जीवन वाचवू.

माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही पाहिले असेल की काही दिवसांपूर्वी मी आपल्या युवा मित्रांशी, विद्यार्थ्यांशी, ‘परीक्षेवर चर्चा’ केली होती. ह्या चर्चेच्या वेळी काही विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांना परीक्षेत गणिताची भीती वाटते. त्याच प्रमाणे हीच गोष्ट अनेक विद्यार्थ्यांनी मला आपल्या संदेशात देखील पाठवली होती. त्यावेळी मी हे नक्की केले होते की ह्या वेळी मन की बात मध्ये मी ह्या विषयवार निश्चित चर्चा करेन.

मित्रानो, गणित हा असा विषय आहे जो भारतीय लोकांना सगळ्यात सोपा वाटायला हवा. कारण, संपूर्ण जगभरात गणितातले सर्वात जास्त शोध आणि योगदान भारतीयांनीच तर दिलेले आहे.  शून्य म्हणजे झिरोचा शोध आणि त्याचे महत्व ह्या विषयी  आपण पुष्कळ ऐकले असेल. अनेकदा आपण असे पण ऐकत असाल की जर शून्याचा शोध लागला नसता तर कदाचित आपण जगात इतकी वैज्ञानिक प्रगती देखील पाहू शकलो नसतो. कॅल्क्युलस पासून कॉम्प्युटर पर्यंत हे सगळे वैज्ञानिक शोध शून्यावरच तर आधारित आहेत. भारतातल्या गणितज्ञांनी आणि वैज्ञानिकांनी असे  देखील लिहून ठेवले की

यत किंचित वस्तु तत सर्वं, गणितेन बिना नहि !

अर्थात, ह्या संपूर्ण ब्रह्मांडात जे जे काही आहे ते सर्व गणितावर आधारलेले आहे. आपण विज्ञानाचा अभ्यास आठवलात तर ह्याचा अर्थ पण आपल्या लक्षात येईल. विज्ञानाच्या प्रत्येक तत्वात एक गणितीय सूत्रच तर सांगितलेले असते. न्यूटनचे नियम असतील, आईनस्टाईन चे सुप्रसिद्ध समीकरण असेल, ब्रह्मांडाशी जोडलेले सगळे विज्ञान एक गणितच तर आहे.  आता तर वैज्ञानिक देखील Theory of Everything विषयी चर्चा करतात, म्हणजेच असे एक सूत्र, ज्या द्वारे ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीला अभिव्यक्त केले जाऊ शकेल. गणिताच्या साहाय्याने वैज्ञानिक जाणिवेच्या इतक्या विस्ताराची कल्पना आमच्या ऋषींनी नेहमीच केलेली आहे.

आम्ही शून्याचा शोध लावला आणि त्याच  बरोबर अनंताला म्हणजेच infinite ला देखील व्यक्त केले.  सर्वसाधारण चर्चांमध्ये आम्ही जेव्हा संख्यांची आणि आकड्यांची विषयी बोलतो तेव्हा दशलक्ष, अब्ज, ट्रिलियन पर्यंत बोलतो आणि विचार करतो. पण वेदात आणि भारतीय गणितात तर ही गणना खूप पुढेपर्यंत जाते. आमच्या कडे एक श्लोक प्रचलित आहे.

एकं दशं शतं चैव, सहस्रम् अयुतं तथा |

लक्षं च नियुतं चैव, कोटि: अर्बुदम् एव च ||

वृन्दं खर्वो निखर्व: च, शंख: पद्म: च सागर: |

अन्त्यं मध्यं परार्ध: च, दश वृद्ध्या यथा क्रमम् ||

ह्या  श्लोकात  संख्याचा क्रम सांगितला आहे.  जसे की

एक, दहा, शंभर,हजार आणि अयुत !

लाख, नियुत आणि  कोटि म्हणजे  करोड़ |

ह्याच प्रमाणे ह्या संख्या शंख, पद्म आणि  सागर पर्यंत जातात. एक सागर चा अर्थ होतो की  10 ची  power 57 | केवळ हेच नाही तर ह्याच्या पुढे देखील आहे, ओघ और महोघ सारख्या  संख्या असतात.  एक महोघ म्हणजे – 10 ची  power 62 च्या बरोबर, म्हणजे एकाच्या पुढे 62 शून्य, sixty two zero |आपण इतक्या मोठ्या संख्येचा नुसता विचार देखील डोक्यात करून पाहिला, तरी कठीण वाटतो. पण भारतीय गणितात ह्याचा उपयोग हजारो वर्षांपासून होत आला आहे.  आत्ताच काही दिवसांपूर्वी मला  Intel कंपनी चे  सीईओ भेटले होते. त्यांनी मला एक painting दिले होते ज्यात  वामन अवताराच्या माध्यमातून अशाच एका एका गणनेच्या किंवा मापनाच्या भारतीय पद्धति चे  चित्रण केलेले होते. Intel चे नाव आले की  Computer आपल्या डोक्यात आपोआप आलाच असेल.  Computerच्या भाषेत आपण binary system च्या विषयी  देखील ऐकले असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की आमच्या देशात आचार्य पिंगला सारखे  ऋषि होऊन गेले, ज्यांनी  binary ची  कल्पना केली होती. ह्याच प्रमाणे  आर्यभट्ट पासून ते  रामानुजन सारख्या गणितज्ञांपर्यंत  गणिताच्या अनेकानेक  सिद्धांतांवर आमच्या इथेच काम झाले आहे.

मित्रानो, आम्हां भारतीयांसाठी गणित कधीच अवघड विषय नव्हता, ह्याचे एक कारण आमचे वैदिक गणित देखील आहे.  आधुनिक काळात  वैदिक गणिताचे  श्रेय जाते – श्री भारती कृष्ण तीर्थ जी महाराजांना | त्यांनी गणनेच्या जुन्या पद्धतींचे पुनरुज्जीवन केले आणि त्याला वैदिक गणित असे नाव दिले. वैदिक गणिताची सर्वात विशेष गोष्ट ही आहे कि त्याच्या द्वारे आपण कठीणातील कठीण आकडेमोड निमिषार्धात मनातल्या मनात  करू शकता. आजकाल तर  social media वर  वैदिक गणित शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्या कितीतरी युवकांच्या videos देखील आपण पाहिल्या असतील.

मित्रांनो, आज ‘मन की बात’ मध्ये  वैदिक गणित शिकवणारे  असेच  एक मित्र आपल्यासोबत जोडले जात आहेत.  हे मित्र आहेत कोलकाता चे  गौरव टेकरीवाल जी | आणि ते गेल्या दोन अडीच दशकांपासून वैदिक गणिताच्या ह्या चळवळीत अत्यंत समर्पित  भावनेने काम करीत आहेत. या, त्यांच्याशीच काही गोष्टी बोलू या. 

मोदी जी – गौरव जी नमस्ते !

गौरव – नमस्ते सर !

मोदी जी – मी ऐकले  आहे की वैदिक गणिताची आपल्याला खूप आवड आहे, त्या विषयी आपण बरेच काही करत असता. तर आधी मी आपल्याविषयी काही जाणून घेऊ इच्छितो आणि नंतर ह्या विषयाची आवड आपल्याला कशी लागली ते जरा मला सांगाल ?

गौरव – सर वीस वर्षांपूर्वी जेव्हा मी Business School साठी अर्ज करत होतो, तेव्हा त्याची स्पर्धा परीक्षा असायची, जिचे नाव होते CAT | त्यात खूप सारे गणिताचे प्रश्न असायचे. जे खूप कमी वेळात करायला लागायचे.  तर माझ्या आईने मला एक पुस्तक आणून दिले ज्याचे नाव होते – वैदिक गणित | स्वामी श्री भारतीकृष्णा तीर्थ जी महाराजांनी ते पुस्तक लिहिले होते.  आणि त्यात त्यांनी 16 सूत्र दिली होती. ज्यात गणिते खूपच पटकन आणि सोपी होत असत.  जेव्हा मी ते वाचले तेव्हा मला खूप प्रेरणा मिळाली आणि गणिताविषयी आवड देखील निर्माण झाली. माझ्या लक्षात आले हा विषय जो भारताची देणगी आहे, आपला वारसा आहे, तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवला जाऊ शकतो. तेव्हा पासून मी हे आपले कार्य/ उद्देश्य  ठरवले की गणिताला जगाच्या कान कोपरयात पोचवेन. कारण गणिताची भीती प्रत्येकाला सतावत असतेच. आणि वैदिक गणितापेक्षा जास्त सोपे काय असू शकेल! 

मोदी जी – गौरव जी किती वर्षांपासून आपण ह्या विषयी काम करत आहांत  ?

गौरव – मला आता जवळ जवळ २० वर्ष झाले सर ! मी त्यातच मग्न झालो आहे.

मोदी जी – आणि जागृतीसाठी साठी काय काय करता? काय प्रयोग करता? कसे जाता  लोकांपर्यंत?

गौरव – आम्ही शाळांतून जातो, online शिकवतो. आमच्या संस्थेचे नाव आहे Vedic Maths Forum India | ह्या संस्थेमार्फत आम्ही internet च्या  माध्यमातुन 24 तास Vedic Maths शिकवतो  सर !

मोदी जी – गौरव जी आपल्याला तर माहितीच आहे, मी सतत मुलांसोबत गप्पा गोष्टी करणे पसंत करतो आणि तशी संधी शोधत असतो. आणि  exam warrior ने तर एक प्रकारे मी त्याला संस्थात्मक रूप दिले आहे आणि माझा अनुभव आहे की जेव्हा मी मुलांशी गप्पा मारतो तेव्हा गणिताचे नाव ऐकताच ती पळून जातात. आणि माझा प्रयत्न असाच आहे की विनाकारण हा जो बागुलबुवा निर्माण झाला आहे त्याला पळवून लावावे, ही जी भीती निर्माण झाली आहे ती दूर व्हावी, आणि छोटी छोटी तंत्रे जी परंपरेने चालत आली आहेत, भारताला  गणित विषयात काही नवीन नाही आहेत. बहुतेक जुन्या परंपरांमध्ये भारतात  गणिताची परंपरा आहे, तर  exam warrior ना भीती घालवायची असेल तर आपण काय सांगाल त्यांना ?

गौरव – सर हे तर मुलांसाठी सर्वात जास्त उपयोगी आहे. कारण परीक्षेची भीती, बागुलबुवा झाला आहे प्रत्येक घरात. परीक्षेसाठी मुले शिकवणी लावतात, पालक पण त्रस्त होतात. शिक्षक पण त्रासलेले असतात.  तर वैदिक गणितामुळे  हे सगळे  छूमंतर होऊन जाते.  साधारण गणितापेक्षा   वैदिक गणित १५०० टक्के जलद होते. ह्यामुळे मुलांच्यात आत्मविश्वास येतो आणि मेंदू देखील जलद चालायला लागतो. जसे आम्ही वैदिक गणिताच्या सोबत  योगाची पण ओळख करून देतो.  ज्यामुळे मुलांना पाहिजे तर वैदिक गणिताद्वारे ते डोळे मिटून देखील गणिते करू शकतात.

मोदी जी – तसे तर ध्यान परंपरा आहे त्यात देखील ह्या प्रकारे गणिते करणे हा ध्यानाचा एक प्राथमिक अभ्यासक्रम देखील असतो.

गौरव – Right Sir !

मोदी जी – चला,  गौरव जी, खूप चांगले वाटले मला, आणि आपण हे जे उद्दिष्ट ठेवले आहे आणि विशेष करून आपल्या आई आपल्याला एका गुरूच्या रूपात ह्या मार्गावर घेऊन गेल्या आहेत. आणि आज आपण लाखों मुलांना ह्या मार्गा वरून घेऊन जात आहात. माझ्या कडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा! 

गौरव – धन्यवाद  सर ! मी आपले आभार मानतो सर ! की वैदिक गणिताला आपण महत्व दिले आणि मला निवडले सर! आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत सर!

मोदी जी – खूप खूप धन्यवाद | नमस्कार |

गौरव – नमस्ते सर |

मित्रांनो, गौरवजीनी खूप चांगल्या प्रकारे सांगितले की वैदिक गणित गणिताला कसे अवघडापासून सोपे  बनवते. केवळ हेच नाही तर  वैदिक गणिताने  आपण मोठमोठ्या वैज्ञानिक समस्या पण सोडवू शकता. माझी इच्छा आहे सर्व मातापित्यांनी आपल्या मुलांना वैदिक गणित जरुर शिकवावे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास तर वाढेलच, त्यांच्या मेंदूची विश्लेषणात्मक शक्ती देखील वाढेल. आणि हो, गणिताविषयी मुलांच्या मनात जी थोडी फार भीती असते ती देखील नाहीशी होईल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ मध्ये  आज Museum/ संग्रहालयांपासून ते गणितापर्यंत अनेक  ज्ञानवर्धक विषयांवर  चर्चा झाली. हे सगळे विषय आपण सर्वांच्या सूचनांमधूनच ‘मन की बात’ चा हिस्सा बनतात. आपण ह्यापुढे देखील मला आपल्या सूचना Namo App आणि  MyGov च्या माध्यमातून पाठवत राहा.

येणाऱ्या काही दिवसांत देशात ईद चा सण  येणार आहे. ३  मे ला अक्षय तृतीया आणि भगवान परशुराम जयंती देखील साजरी होईल. काही दिवसांनी  वैशाख बुद्ध पौर्णिमेचा उत्सव येईल. हे सगळे सण संयम, पवित्रता, दान आणि  सौहार्दाचे उत्सव आहेत.  आपणां सर्वाना ह्या उत्सवांच्या अग्रिम शुभेच्छा! हे सण खूप आनंदाने, सौहार्दाने साजरे करा.  ह्या सगळ्यात आपल्याला कोरोनापासून पण सावध राहायला हवे. मास्क लावणे,  थोड्या थोड्या वेळाने हात धूत राहणे, बचाव करण्यासाठी जे जे जरुरी उपाय असतील त्यांचे आपल्याला  पालन करत राहायचे आहे. पुढच्या वेळी  ‘मन की बात’ मध्ये आपण पुन्हा भेटू या आणि आपण पाठवलेल्या नव्या नव्या विषयांवर चर्चा करू या. तो पर्यंत आपला निरोप घेतो. खूप खूप धन्यवाद !