भारनियमन आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न

महावितरणच्या सूक्ष्म नियोजनाच्या तासागणिक आढाव्याला यश

औरंगाबाद ,२३ एप्रिल  /प्रतिनिधी :-विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यासाठी महावितरणने केलेले सूक्ष्म नियोजन फलदायी ठरले असून मागणीएवढा वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात विजेचे भारनियमन आटोक्यात आले असून सर्वच वर्गवारीतील फिडरवर महावितरणने अखंडित वीजपुरवठा करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.   

महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मितीला फटका बसला आहे. यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, बिहार व झारखंड आदी राज्यांत विजेचे साधारणतः १० ते १५ टक्के भारनियमन केले जात आहे. परंतु महावितरणकडून करण्यात आलेल्या अथक प्रयत्नांमुळे विविध स्रोतांकडून अतिरिक्त स्वरूपात पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध करण्यात आली आहे. त्याची फलश्रुती म्हणून महाराष्ट्रात विजेच्या उच्चांकी मागणीप्रमाणे सुरळीत वीजपुरवठा करण्यात महावितरणला यश आले आहे.      

राज्यातील विजेचे तात्पुरते भारनियमन कोणत्याही परिस्थितीत टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत सातत्याने बैठका घेऊन आवश्यक उपाययोजना वेगाने व ताबडतोब करण्याची सूचना दिल्या. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे बैठकांना उपस्थित होते.

राज्यातील ग्राहकांना अखंडित वीज मिळेल याची खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले. त्यानंतर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या नेतृत्वाखाली महावितरणने विजेची मागणी व उपलब्धता याचे सूक्ष्म नियोजन केले आहे. कोणत्या वीजनिर्मिती कंपन्यांकडून व कोणत्या स्रोताकडून प्रत्येक तासाला किती वीजपुरवठा उपलब्ध होत आहे, याकडे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मागणीएवढी वीज उपलब्ध होईल यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. तसेच काही कारणांमुळे मागणी व उपलब्धततेत तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. या प्रयत्नांमुळे महावितरणने भारनियमनाचे योग्य व्यवस्थापन करून विजेची उपलब्धतेमध्ये वाढ करण्यात यश आले आहे. कोळसा टंचाईच्या पार्श्वभूमीवर सुरळीत वीज पुरवठ्याची हीच परिस्थिती कायम ठेवण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.     

महावितरणची शनिवारी दुपारी ४ वाजता २४ हजार ८७७ मेगावॅट विजेची मागणी होती. त्यासाठी महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांतून ७३८० मेगावॅट, केंद्राकडून ६१०२ मेगावॅट, उरण गॅसमधून २१३ मेगावॅट, कोयना जलविद्युत प्रकल्पातून ११३४, सीजीपीएलकडून ६२२ मेगावॅट, जीएमआरकडून २०० मेगावॅट, अदानीकडून २९५१ मेगावॅट, रतन इंडियाकडून १२०० मेगावॅट, पॉवर एक्सचेंजमधून ४२६ मेगावॅट, साई वर्धाकडून २४० मेगावॅट, बाहेरच्या राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून १२२६ मेगावॅट, राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून ९१५ मेगावॅट, पवन ऊर्जा प्रकल्पांकडून ८५ मेगावॅट,सहवीज निर्मितीतून ९९६, लघुजलविद्युत व अन्य स्रोतांकडून २२७ मेगावॅट, रिअल टाइम मार्केटमधून ४२४ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. त्यामुळे राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करता आला.    

येत्या काळात सुद्धा ही परिस्थिती कायम राहील यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच भारव्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यालय व जिल्हा स्तरावर स्थापन केलेल्या वॉर रूममधून तासागणिक आढावा घेतला जात आहे.