नवाब मलिकांवरील ईडी कारवाईत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली ,२२ एप्रिल  /प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई विरोधात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

दाऊदच्या हस्तकाशी संबंधित सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध आहे, या आरोपावरून ईडीने त्यांना २३ फेब्रुवारीला अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड कारागृहात आहेत. दरम्यान ईडीने मलिक यांच्या विविध मालमत्तांवर जप्ती केली.

एकूणच या सर्व कारवाई विरोधात आणि अंतरिम जामीनासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. मलिक यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाची नोंद घेऊन सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज, शुक्रवारी सुनावणी झाली. यात सध्या तपास सुरू असल्याने हस्तक्षेप करणं योग्य नाही, असे सांगत सदर अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे मलिकांना आणखी काही काळ कोठडीतच राहावे लागणार आहे.