विवाहित नर्सचा गर्भपात ,आरोपीला महिन्यानंतर अटक

औरंगाबाद ,२० एप्रिल  /प्रतिनिधी :- लग्नाचे आमिष दाखवून विवाहित नर्सशी शारिरिक संबंध ठेवत दोन वेळा तिचा गर्भपात करुन पसार झालेल्या आरोपीला जवाहर नगर पोलिसांनी तब्बल महिन्‍याभरनंतर गुरुवारी दि.२० दुपारी अटक केली. आरोपीला २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एम. कादरी यांनी दिले. नागेश ऊर्फ नागोराव अशोकराव पोले (२८, रा. व्‍यंकटेशनगर) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात ३० वर्षीय विवाहीत नर्सने फिर्याद दिली. फिर्यादी  हिचा विवाह झाला असुन तिला एक मुलगा देखील आहे. फिर्यादी ही सन २०१५ ते २०१९ दरम्यान आरोपीच्‍या काकाच्‍या हॉस्पिटलमध्‍ये नर्स म्हणुन काम करीत होती. हॉस्‍पीटलमध्‍येच त्‍यांची ओळख झाली. त्‍यानंतर  ते एकमेकांना फोनवर संपर्कात होते. याबाबत फिर्यादीच्‍या पतीला सुगावा लागला. त्‍याने दोघांना समजावून सांगितले. त्‍यानंतर वर्षभर फिर्यादीने आरोपीला बोलणे बंद केले. मात्र आरोपी फिर्यादीला वारंवार फोन करायचा, हॉस्‍पीटलमध्‍ये बोलण्‍याचा प्रयत्‍न करायचा मात्र फिर्यादी त्‍याच्‍याकडे दुर्लक्ष करित होती. नोव्‍हेंबर २०१९ मध्‍ये फिर्यादीच्‍या कुटूंबात घरगुती वाद झाला. त्‍यावेळी फिर्यादीच्‍या दिराने  तिच्‍यावर हात उचलला आणि पती देखील तिच्‍याशी व्‍यवस्थित  बोलत नव्‍हता. डिसेंबर २०१९ पासून फिर्यादी ही एकटी रुम करुन राहु लागली. त्‍यानंतर पुन्‍हा फिर्यादी आणि आरोपीमध्‍ये संपर्क वाढत गेला. फिर्यादीच्‍या रुमवर आरोपी राहु लागला. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल दोन वर्ष तिच्‍याशी शारिरिकसंबंध प्रस्‍थापित केले. दरम्यान फिर्यादी मार्च आणि ऑक्‍टोबर २०२० मध्‍ये दोन वेळा गर्भवती राहिली. आरोपीने एकदा ज्योती हॉस्‍पीटल आणि एकदा घरी किट आणुन गर्भपात केला. १२ मार्च रोजी आरोपीने फिर्यादीशी वाद घालून लग्न करण्‍यास नकार दिला. व फोन बंद करुन निघुन गेला. प्रकरणात जवाहरनगर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

तपासादरम्यान मिळालेल्या माहिती आधारे, पोलिसांनी आरोपीला जानता राजा कॉलनी (मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक) येथून अटक करुन  न्‍यायालयात हजर केले. सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील योगेश तुपे यांनी आरोपीची वैद्यकिय तपासणी करयाची आहे. आरोपीने गुन्‍ह्यात वापरलेला मोबाइल हस्‍तगत करायचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.