दुसऱ्याच्या फांदीवर बसलेले मुख्यमंत्री येत्या मे-जूनमध्ये येणाऱ्या वादळात कोसळतील

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार

मुंबई ,१९ एप्रिल /प्रतिनिधी :-  केवळ पद, खुर्चीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपसोबत गद्दारी केली आहे. गेल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात जायला वेळ मिळाला नाही. दुसऱ्याच्या फांदीवर बसलेले मुख्यमंत्री येत्या मे-जूनमध्ये येणाऱ्या वादळात कोसळतील, असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी व्यक्त केले.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुलाखत सोमवारी प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत राणे यांनी राज्यातील एकूण बिघडलेली स्थिती यावर परखड मते व्यक्त केली. राज्य दिवाळखोरीकडे चालले आहे. नवे उद्योग येत नाहीत, गुंतवणूक नाही, रोजगार नाहीत, अशा स्थितीत राज्याला पिछाडीवर नेण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने केले आहे. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. गृहखाते सांभाळण्यासाठी सक्षम गृहमंत्री नाही. त्यामुळे राज्यात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा टोला त्यांनी मारला. आज मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असले तरी शिवसेना संघटनेला त्याचा काहीही फायदा होत नाही. शिवसैनिक पदाधिकारी यांना पक्षप्रमुख भेट देत नाहीत. राज्याचा मुख्यमंत्री कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे २५ आमदारही निवडून येणार नाहीत, इतकी बिकट स्थिती शिवसेनेची झाली आहे, त्यामुळे राज्याचे चित्र वेगळे दिसेल.

राज ठाकरे यांच्यात बाळासाहेबांचे रूप आपल्याला दिसते का? असा सवाल विचारण्यात आला असता राणे म्हणाले की, बाळासाहेबांची कोणाशी तुलना होऊ शकत नाही. ते हिंदुत्वाचा पेटता निखारा होते. त्यांनी पदासाठी कधी सौदेबाजी केली नाही.

राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंगे काढा या भूमिकेवर बोलताना नारायण राणे म्हणाले की, भोंगे लावण्यासाटी परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे कायद्याला बगल देऊन जर भोंगे लावले जात असतील, तर त्यावर कारवाई व्हायलाच हवी. मात्र या आघाडी सरकारकडे भोंगे हटविण्याची हिम्मत नाही. तसेच दिशा सालियन प्रकरणात न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात नेमके काय घडले, हे सचिन वाझे याला विचारा? पार्टीत कोण होते? बाहेर कोणाची गाडी उभी होती? या पार्टीत राज्यातील कोण मंत्री उपस्थित होता? याची माहिती वाझेकडून मिळेल.

अधीश बंगल्यावर मुंबई महापालिकेकडून जी नोटीस पाठविण्यात आली आहे, ती राजकीय सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप राणे यांनी केला. आम्ही कधीच रडीचा डाव केला नाही. दुसऱ्यांची घरे उद्ध्वस्त करण्याचे काम आम्ही करत नाही. नाही तर तक्रारी करायला आमच्याकडे अनेक गोष्टी होत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सुडातून पाठवलेली नोटीस

मुंबई महापालिकेने नारायण राणे यांच्या बंगल्याबाबत पाठवलेल्या नोटिशीबाबत बोलताना ते म्हणाले की, मुंबई महापालिकेने जी नोटीस पाठवली आहे, ती सुडाच्या भावनेतून पाठवली आहे. मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातील जवळपास ९० टक्के बांधकामे बेकायदेशीर आहेत. अगदी ‘मातोश्री’जवळ असलेल्या बेहराम पाड्यात तीन-तीन मजल्यांची घरे असून ती सगळी बेकायदेशीर आहेत. पण तिथे पाहायचे धाडस या सरकारमध्ये नाही. माझ्या घरासाठी ओसी मिळाल्यानंतर, सर्व अधिकृत परवाने मिळाल्यानंतर मी घरात प्रवेश केला आहे. तरीही अधिकारी आले, इथे गार्डन पाहिजे, तुम्ही अंतर्गत बदल केले आहेत, असे सांगून नोटिसी दिल्या. मी त्याला उत्तर देतोय. हे केवळ राजकारण आहे. कायदेशीर कारवाई नाही. त्यांना फक्त माझंच घर दिसतंय. बाकी ठिकाणी फिरताना ते डोळे झाकून फिरतायत, अगदी मुख्यमंत्रीही तसेच. देशात लोकशाही असून माझा न्यायालयावर विश्वास आहे. त्यामुळे कारवाई कोणती जरी केली, तरी मी काही चुकीचे केलेले नाही. मला नोटिशी देणाऱ्या प्रत्येकाने आपली घरे पाहावीत. मीही तक्रार करू शकतो, मीही नोटीस द्यायला लावू शकतो. पण कुणाच्या भावनिक जागी मला राजकारण आणायचे नाही, असे नारायण राणे म्हणाले.

सुशांत, दिशा सालियनला न्याय मिळणार

राज्यात मुख्यमंत्री कुठे आहेत? कायदा-सुव्यवस्था कुठे आहे? सुशांतसिंग राजपूत, दिशा सालियन यांच्या केसचे काय झाले? दिशावर अत्याचार होऊन तिचा खून झाला आहे. सुशांतचाही खून झालाय. काय केले या सरकारने? पण मला माहीत आहे, आज ना उद्या लवकरच या दोघांनाही न्याय मिळणार. त्या केसमधील खरे आरोपी लवकरच सीबीआयच्या जाळ्यात अडकणार.