मंत्रालयात पुरातत्व किल्ले आणि लेण्यांचे दर्शन !

मंत्रालयात पुरातत्व किल्ले आणि लेण्यांचे दर्शन !

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत असणाऱ्या पुरातत्व विभागामार्फत ऐतिहासिक वास्तुंचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. राज्यातील मोडकळीस आलेले गड-किल्ले यांचे जतन करून ती पुन्हा पर्यटनासाठी खुली करण्यात आली आहेत. याचबरोबर औरंगाबाद येथील अजिंठा लेण्यातील चित्रे २००० वर्षे जुनी आहेत. त्या चित्रांना डिजिटल स्वरूपाने पुनर्संचयित करण्याचे कामही सुरू आहे. हे पुनर्संचयित करण्यात आलेल्या चित्रांचे तसेच गड-किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात भरविण्यात आले आहे. भारताची संस्कृती व परंपरा जतन करून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून शासन करीत असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.

गौतम बुद्धांचे विविध अवतार, त्यांच्या पुनर्जन्माच्या गोष्टी, नैतीक मुल्यांसह प्रेरित करणाऱ्या जातक कथा, लेण्यांच्या भित्तीवरील कोरीव काम, याचबरोबर शिवकालीन किल्ले जतन करण्यापूर्वी आणि जतन केल्यानंतरची छायाचित्रे येथे अनुभवयास मिळतात. आमदार संजय दौंड, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त वीरेंद्र सिंह, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी आवर्जुन या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमास हजेरी लावली.

अजिंठा लेण्यांमधील दोन हजार वर्षे जुने चित्रांचे रंग आजही आपणास पहावयास मिळतात. मात्र, मोठ्या प्रमाणात हे रंग पुसट अथवा निघून गेले आहेत. त्यामुळे अनेक चित्रांचे अर्थ स्पष्ट होत नाहीत. अजिंठा येथील २९ लेण्यांमध्ये जातक कथा सांगणारी चित्रे आहेत. या कथांमधून सांस्कृतिक दुवे तसेच नीतिमूल्ये दिसून येतात.

या लेण्यातील सातवाहनकालीन चित्रकला पाहून तत्कालीन चित्रकारांचे कौशल्य लक्षात येते. जागतिक वारसा असलेली अजिंठा लेणीतील अभूतपूर्व कला जतन करून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचविता यावी यासाठी या चित्रांचे डिजिटल स्वरूपात पुनर्संचयित करण्याचे काम राष्ट्रीय ख्यातीचे संशोधक छायाचित्रकार प्रसाद पवार यांच्या फाऊंडेशनमार्फत सुरू आहे. अशाच पुनर्संचयित केलेल्या 350 छायाचित्रांचे प्रदर्शन मंत्रालयात २२ एप्रिलपर्यंत भरविण्यात आले आहे.

राष्ट्रीय ख्यातीचे संशोधक छायाचित्रकार प्रसाद पवार यांची रिस्टोरेशन आर्टिस्ट अशीही ओळख आहे. २००० वर्षांपूर्वीची संस्कृती, वारसा, जीवनशैली चित्रकलेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचचावी यासाठी ती जतन करणे आवश्यक असल्याने त्यांनी १९८९ पासून संशोधन सुरू केले. २००७ पासून पुरातत्व शास्त्र विभागाच्या परवानगीने या लेण्यांतील चित्रांची छायाचित्रे काढण्यास सुरवात केली. भारतातील चित्र संस्कृती, वास्तुरचना, जीवन, तत्वज्ञान, प्रगतरचना, सामाजिक जीवन, प्राणी, मानव यांचे संबंध हे या चित्रातून चित्रकारांनी त्या काळात मांडण्याचा अप्रतिम प्रयत्न केला असल्याचे श्री. पवार सांगतात. त्यावेळी लोक विशेषत: महिला आणि राजे-महाराजे जे अलंकार, कपडे वापरत असत त्यातील प्रगतीही या चित्रांमधून स्पष्ट होते. 1000 शब्दांचे वर्णन एकाच चित्रातून व्यक्त होते किंवा आपण वाचन केल्यावर त्या काळातील हुबेहुब चित्र उभे राहणे थोडे कठीण आहे, मात्र चित्रातून ते लगेच स्पष्ट होते. त्यामुळे लेण्यांमधील ही चित्रे आपल्याला दोन हजार वर्षापूर्वींच्या जीवनशैलीत घेऊन जातात असेही श्री.पवार यांनी सांगितले. या महत्त्वपूर्ण इतिहासाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही या चित्रांचे फोटो काढतो आणि जे रंग निघून गेले आहेत, तिथे कशा प्रकारचे रंग असतील याचे संशोधन करून डिजिटल स्वरूपात ती चित्रे रिस्टोर करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचेही श्री प्रसाद पवार यांनी सांगितले. प्रसाद पवार फाउंडेशनच्यावतीने २०१२ पासून जगभर १०० कोटी लोकांपर्यंत भारतीय चित्र संस्कृतिचा महत्त्वाचा पुरावा प्रदर्शित करण्यासाठी पुढाकाराने प्रयत्न करीत आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन करणे आणि जगभर पोहोचविणे महत्त्वाचे असल्याचेही श्री पवार यांनी सांगितले.

या प्रदर्शनात अजिंठा लेणीची सफर होतेच याचबरोबर नांदेड येथील माहूर किल्ला, लातूर येथील औसा, पुणे येथील तोरणा किल्ला, नाशिक येथील अंकाई किल्ला अशा अनेक शिवकालीन किल्ल्यांचे जतन करण्यापूर्वीचे आणि जतन नंतरचे छायाचित्र या प्रदर्शनात आपणास पहावयास मिळतात.  पाषाणयुगापासून मध्ययुगापर्यंत काताळातील कोरीव खोदचित्रही येथे पहावयास मिळतात.

श्रद्धा उमेश मेश्राम

[email protected]