भाषा समृद्धीसाठी कोशनिर्मितीकडे लक्ष देणे गरजेचे- गणेश विसपुते

नांदेड ,१९ एप्रिल  /प्रतिनिधी :- नवे शब्द घडवणे, पर्यायी शब्द जतन करणे, परिभाषा समजून घेणे ही भाषा विकासासाठी आवश्यक बाब आहे. भाषा समृद्धीसाठी कोशनिर्मितीकडे आणि शब्दकोशांच्या संपादनावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी आणि भाषांतरकार गणेश विसपुते यांनी केले.  

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा संकुलामध्ये गणेश विसपुते यांच्या सत्काराचे व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उत्तरादाखल विसपुते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. शैलजा वाडीकर होत्या. अनुवादक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी गणेश विसपुते यांची यावेळी मुलाखत घेतली. इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. रमेश ढगे, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, कवी डॉ. आदिनाथ इंगोले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

संकुलाच्या संचालिका डॉ. शैलजा वाडीकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथभेट देऊन विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गणेश विसपुते यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. पृथ्वीराज तौर यांनी विसपुते यांच्या वाङ्मयीन कार्याची सविस्तर ओळख करून दिली.  

भाषांतर मीमांसा, वाङ्मयीन संस्कृती, लेखकाचे व्यक्तिमत्त्व, सामाजिक चळवळी आदी मुद्यांवर गणेश विसपुते यांच्याशी संवाद साधण्यात आला. जालना जिल्ह्यातील भोकरदनपासून पुण्यापर्यंतचा प्रवास, चित्रकला आणि चित्रपटाची आवड, ग्रंथालये व वाचनाचे महत्व याबाबत विसपुते यांनी दिलखुलास उत्तरे दिली.  

डॉ. पी. विठ्ठल, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. विनायक येवले, रविंद्र टाटू, दिगंबर सत्वधर, पवन वडजे, स्नेहा सूर्यवंशी यांनी चर्चेत सहभाग नोंदविला. डॉ. शैलजा वाडीकर यांनी शेवटी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमास डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ. नीना गोगटे, डॉ. झिशान अली, डॉ. योगिनी सातारकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.