बंद हॉटेलच्या खुर्चीवर नवजात अर्भक सोडून त्याची आई पसार

जालना ,१६ एप्रिल  /प्रतिनिधी :- बंद हॉटेलच्या खुर्चीवर नवजात अर्भक सोडून त्याची आई पसार झाली आहे.
  जालना ते अंबड रोडवर लालवाडी येथील संतोष आसाराम चव्हाण (४५) हे शनिवारी सकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना पारनेर शिवारात असलेल्या बंद सावता हॉटेलमधून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज त्यांना आला.  त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता एका खुर्चीवर कापडामध्ये पुरुष जातीचे नवजात अर्भक गुंडाळलेले आढळून आले.ते बालक रडत होते.  त्यांनी हॉटेलमालक दामोधर खरे यांना झोपेतून उठवून माहिती दिली. त्या दोघांनी परिसरात काहीकाळ या अर्भकाच्या नातेवाईकाचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत. 

अंबड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन पतंगे यांना मोबाईलवरून याबाबत तातडीने माहिती देण्यात आली.  पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून अर्भकास जालना येथी जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळावर उपचार सुरु असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. याबाबत भादंवि. 317 कलमान्वये अज्ञात आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाळाच्या नाळाला स्टॅग लावलेला असून, उजव्या पायाच्या पंजाचा ठसा घेतल्याची शाईची निशाणी आहे, त्यामुळे त्याचा जन्म एखाद्या सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात जन्म झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या बाळाचा शासकीय बालकल्याण समितीकडे ताबा देण्यासाठी अंबड पोलीस सकाळपासून संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते,  शेवटी सायंकाळी उशिरा औरंगाबाद येथील बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसाची सलग सुट्टी आहे, तुम्हीच सोमवारपर्यंत बाळाचा सांभाळ करा, असे पोलिसांना सांगितल्याची माहीती पतंगे यांनी दिली   या बाळासोबत अंबडचे पोहेकाँ. विष्णू चव्हाण, महिला पोना. सविता वीर, पोना. सुधाकर शेंडगे, देवधन ढेंगळे  रुग्णालयात आहेत.

बाळाला औरंगाबादच्या शिशुगृहात

जालन्यात शिशुगृह नसल्याने या बाळाला औरंगाबादच्या शिशुगृहात आणावे लागणार आहे. सध्या उपचारासाठी बाळाला दवाखान्यात दाखल केले आहे. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यावरच बालकल्याण समिती बाळाला औरंगाबादला आणण्याचे आदेश देईल. या प्रकरणाची सकाळी साडे नऊ वाजता नोंद असून दुपारी गुन्हा दाखल झाला आहे. 

-अँड. मनोहर बन्सवाल, बाल कल्याण समिती, जालना