चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुंबई ,१४ एप्रिल /प्रतिनिधी :-  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी स्मारक येथे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले.  यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भीमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले.

यावेळी भदन्त धम्मप्रिय यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार राहुल शेवाळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मुंबई महापालिकेचे सहआयुक्त किरण दिघावकर, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे व इतर मान्यवरांनीही डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे मराठी व इंग्रजी कॉफी टेबल बुक प्रदर्शन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शन दालनास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले स्मृतिचिन्ह मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आले.

या कार्यक्रमाचे निवेदन चारुशीला शिनई यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन नागसेन कांबळे, चैत्यभूमी व्यवस्थापक प्रदीप कांबळे, अध्यक्ष सुनील बनसोडे यांनी पाहिले.